उद्रेक न्युज वृत्त :- बसमध्ये कंडक्टरसोबत सुट्ट्या पैशांवरुन वाद झाला नसेल असा एकही माणूस शोधून सापडणार नाही.जो जो बसने प्रवास करतो; त्याच्यासोबत कधी ना कधी असा वादाचा प्रसंग घडला असेलच.असे वाद झाल्यानंतर शक्यतो प्रवाशी वाद आटोपता घेतात. काहीजण वरचे सुट्टे पैसे सोडून देतात.दुकानात देखील खरेदी दरम्यान सुट्टे पैसे नसले तर दुकानदार आपल्याला नको असलेले चॉकलेट जबरदस्ती गळ्यात मारतो.बंगळुरुमध्ये एका बसमध्ये सुट्ट्या पैशांवरुन असाच एक वाद झाला.पण प्रवाशी इतका चिवट निघाला की,त्याने थेट ग्राहक न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.न्यायालयाने देखील या प्रवाशाची मागणी ऐकून घेत त्याला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. या आदेशामुळे सदर प्रवाशाला एक रुपयांच्या बदल्यात हजारो रुपयांची नुकसान भरपाई मिळाली.
२०१९ साली रमेश नाइक हे बीएमटीसी (Bangalore Metropolitan Transport Corporation) च्या बसने प्रवास करत होते. शांतीनगर ते मॅजेस्टीक बस डेपोपर्यंत जाण्यासाठी नाइक यांनी तिकीट काढले. तिकीटाचा दर २९ रुपये एवढा होता. नाइक यांनी कंडक्टरला तीन रुपये दिले. मात्र वरचा एक रुपया कंडक्टरकडून नाइक यांना मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या नाइक यांनी थेट जिल्हा ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
ग्राहक न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. नाइक यांनी एक रुपयाच्या बदल्यात १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई मागितली.त्यानंतर न्यायालयाने आदेश दिला की, बीएमटीसीने नाइक यांना दोन हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच तक्रारदाराचे कायदेशीर प्रक्रीयेसाठी खर्च झालेले १ हजार रुपयेही देण्यात यावेत. यामुळे नाइक यांना एक रुपयांच्या बदल्यात तीन हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली.