उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातीलसिरोंचा तालुक्यातील मोकेला येथील एका शेतकरी महिलेच्या बाबतीत विद्युत वितरण कंपनीचा अजब-गजब कारभार पाहून पायाखालची जमीनच सरकली आहे.
कृषिपंपासाठी विद्युत रोहित्र व मीटर न बसविताच विद्युत वितरण कंपनीने ८५ हजार ४४० रुपयांचा बिल पाठविला.या प्रकारामुळे चिंतेत पडलेल्या महिलेने संबंधित कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला निवेदन सादर करून विद्युत बिल माफ करण्याची मागणी केली होती.परंतु,आता जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसून येत नसल्याने विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
रामबाई दुर्गम ही महिला मोकेला येथील एक हेक्टर शेत जमिनीत कापूस हा पीक घेऊन आपला उदरनिर्वाह करीत आहे.पिकासाठी पाण्याची आवश्यकता भासत असल्याने सदर महिलेने बामणी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात कृषी पंपासाठी विद्युत पुरवठा करण्याबाबतचा अर्ज सादर केला होता.त्याअनुषंगाने २०१७ मध्ये शेतात खांब बसवून तारांची जोडणी करण्यात आली.मात्र, आजपर्यंत विद्युत रोहित्र व विद्युत मीटर सुद्धा बसविण्यात आले नाही.त्यामुळे कृषिपंपासाठी विद्युत पुरवठाच न जोडल्याने पिकांना पाणी देणे अशक्य होते.अशातच जून २०२२ मध्ये वीज वितरण कंपनीने चक्क ८५ हजार रुपयांचे बिल पाठविल्याने सदर महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली.विजेचा वापर न करताही कृषी पंपाला हजारोंचा बिल पाठविल्याने आश्चर्यचकित झालेल्या महिलेने बामणी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे चौकशी केली. सोबतच निवेदन देऊन विद्युत बिल माफ करून नवीन मीटर बसवून देण्याची मागणी केली होती.परंतु, संबंधित कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारावर रोष व्यक्त केला जात आहे.