उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा झाली. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला. परंतु नावांमध्ये व खात्यांच्या अंकामध्ये झालेल्या चुकामुळे अजूनही जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत.या शेतकऱ्यांना शासन तातडीने मदत करणार का? असा प्रश्न आमदार डॉ. देवराव होळी यांनी लक्षवेधीतील चर्चेत सहभागी होऊन राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे केला.
यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली असून त्याबाबतचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.तसेच वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत दिली जाईल,असे आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी सभागृहाला दिले. कर्जमाफी झाली त्यावेळेस देण्यात आलेल्या खात्याच्या नावात अंकात, बँकेकडून, प्रशासनाकडून चुका करण्यात आल्या.मात्र त्या चुकांची मोठी किंमत शेतकऱ्यांना चुकवावी लागत आहे.अजुनपर्यंत अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत.त्यासाठी सरकारने गंभीर होऊन लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लवकरात लवकर अशा चुका दुरुस्त करून शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी,अशी मागणी आमदार डॉ.देवराव होळी यांनी शासनाला केली आहे.
गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भटक्या जमातींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.ही जमात अत्यंत गरीब असून हलाखीचे जीवन जगत आहे.त्यांना राहण्यासाठी घर देखील नाही.त्यामुळे त्यांना घरकुल देण्यासंदर्भात शासन स्तरावर आलेला प्रस्ताव तातडीने मंजूर करणार का व त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार का? असा प्रश्न आमदार डॉ.देवराव होळी यांनी राज्याचे इतर मागासवर्गीय मंत्री अतुल सावे यांच्याकडे लक्षवेधी प्रश्नांच्या चर्चेप्रसंगी केला. यावेळी मंत्री सावे यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला असून अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूदही करण्यात आली असल्याची माहिती दिली. शासन स्तरावरील सर्व प्रस्ताव लवकरच मंजूर करून त्यांना योग्य पद्धतीने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी उत्तरादरम्यान सभागृहाला दिले.