- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल ९८ हजार ७८२ मतदारांचे अर्ज प्रलंबित असतांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई केली जात असल्याने होणारी निवडणूक तात्काळ स्थगित करण्यात यावी,यासाठी प्रा.सचिन काळबांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे,नागपूर विभागात मतदार नोंदणीची अंतिम मुदत २६ सप्टेंबर होती.२२ सप्टेंबरपर्यंत विभागात १ लाख ९४ हजार ४०४ अर्ज प्राप्त झाले.मात्र,नोंदणीच्या शेवटच्या चार दिवसांत तब्बल ९८ हजार ७८२ अर्जाचा मोठा ओघ आला.यातील एकट्या नागपूर जिल्ह्यातील ६१ हजार ३७१ अर्ज प्रलंबित आहेत.ऑनलाईन अर्जाच्या प्रक्रियेसाठी प्रशासनाने केवळ दोनच लॉगिन आयडी उपलब्ध करून दिल्याने ही प्रक्रिया अत्यंत मंदावली आणि हजारो अर्ज ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात प्रलंबित राहिले,असा गंभीर आरोप प्रा.काळबांडे यांनी केला आहे.त्यातच, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी अर्ज अद्याप प्रलंबित आहेत.या अर्जाची योग्य प्रकारे छाननी न करताच पात्र मतदारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट न झाल्यास संबंधित मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे प्रलंबित अर्जाची तपासणी करून पात्र मतदारांची नावे मतदारयादीत समाविष्ट करावीत,अशी मागणी करण्यात आली आहे.त्यानुसार,दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेची न्यायालयाकडून दखल घेण्यात आली आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सदरची याचिका ही मुंबई येथील मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे वर्ग केली आहे.याचिकेवर पुढील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.दरम्यान,खंडपीठाचे न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या न्यायपीठासमक्ष या प्रकरणावर प्राथमिक सुनावणी झाली.जर का याचिकाकर्त्याच्या बाजूने निर्णय लागला, तर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणुकी ही लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- Advertisement -

