- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करण्यात येत आहे.मात्र,मेफेड्रोन (एमडी) पावडरची तस्करी जोरात सुरूच आहे.अंमली पदार्थ तस्करांची इतकी हिंमत वाढली आहे की नाकाबंदीत कार न थांबविता पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याला अडविण्यासाठी धावलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालत त्याला फरपटत नेले. यात कर्मचारी जखमी झाला आहे.याशिवाय कारचालकाने दोन पादचाऱ्यांनादेखील उडविले.तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत सेंट्रल एव्हेन्यू येथे सदरची घटना रात्री घडली.
शनिवारी मध्यरात्री भगवाघर चौक ते मोमीनपुरा चौकादरम्यान पोलिसांची नाकाबंदी होती.पोलिस कर्मचारी अनिल सहस्त्रबुद्धे वय ४० वर्षे हेदेखील कर्तव्यावर होते.अचानक दीड वाजताच्या सुमारास काळ्या रंगाची कार क्रमांक- एमएच ०२,सीझेड ६२२१ संशयास्पद रीतीने आली.पोलिसांनी कारला थांबण्याचा इशारा दिला असता,कारचालकाने वेग वाढविला व निघून गेला.सहस्त्रबुद्धे व बीट मार्शल्सने कारचा पाठलाग करून कारला थांबविले.सहस्त्रबुद्धे हे कारच्या मागेच मोटारसायकल लावत असतांना कारचालकाने वेगात गाडी रिव्हर्स घेतली.यामुळे कार थेट सहस्त्रबुद्धे यांच्या अंगावर आली.आरोपीने त्यांना फरपटत नेले.यात त्यांच्या पाठ,खांदा व पायाला मार लागला.त्यानंतर कारचालकाने पादचारी वहीद खान, तसेच मोहम्मद शाहबाज यांना धडक दिली.तसेच तीन ते चार मोटारसायकली,एका घराची पायरी व रेलिंगलादेखील धडक दिली.पोलिसांनी पाठलाग करून एका गल्लीत कारला अखेर थांबविले. पोलिसांनी कारचालक संकेत दिलीप कन्हेरे वय २३ वर्षे,अष्टविनायक अपार्टमेंट,लुंबिनीनगर,मानकापूर, राहुल प्रेमलाल राऊत वय ३२ वर्षे,लुंबिनी बुद्धविहाराजवळ,खापरखेडा व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.तर कुख्यात एमडी तस्कर सोहेल खान वय २५ वर्षे,मानकापूर हा पळून गेला. जखमींना मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले.या प्रकारामुळे घटनास्थळी खळबळ उडाली होती. सहस्त्रबुद्धे यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.तर अल्पवयीन मुलाला पालकांच्या हवाली करण्यात आले.
आरोपी सोहेल व संकेत हे कुख्यात गुंड आहेत. सोहेलने तीन महिन्यांअगोदर एका तरुणावर हल्ला केला होता.मात्र,पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला नव्हता,सदरमध्येदेखील त्याने तलवारीचा धाक दाखवत गोंधळ घातला होता.सोहेल,संकेत व राहुल एमडीची तस्करी करतात.ते एमडी खरेदी करण्यासाठी मोमीनपुरा येथे पोहोचले होते.कार थांबविल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना बेदम चोप दिला. संतप्त नागरिक तहसील पोलीस ठाण्यातदेखील पोहोचले व नारेबाजी करू लागले.पोलिसांनी तेथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून घेतला होता.
- Advertisement -