उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा :- तालुक्यातील भगवानपूर ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामपंचयतीचा दर्जा मिळून तीन वर्षे लोटून गेलीत.मात्र रोजगार हमी योजनेची ऑनलाईन लॉगिन जुन्याच ग्रामपंचायतीकडे असल्याने गावातील भगवानपूर व वाढोना येथील मजुर वर्ग रोजगार हमी योजनेच्या कामापासून कोसोदुर वंचित असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी सावलखेडा ग्रामपंचायतीमध्ये भगवानपूर व वाढोना अशी तिन्ही गावे मिळून गट ग्रामपंचायत होती.मात्र भगवानपूर व वाढोना गावातील पाहिजे त्या प्रमाणात विकास होत नसल्याने नागरिकांनी दोन गावांसाठी भगवानपूर व वाढोना गावाला सावलखेडा ग्रामपंचायतीमधून वगळून भगवानपूर गावाला स्वतंत्र गट ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर मागणी केली होती.त्यानुसार तालुक्यातील सावलखेडा गट ग्रामपंचायतीचे विभाजन करून भगवानपूर गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला.स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळून तीन वर्षे लोटून गेलीत तरी सुद्धा रोजगाराची हमी असलेल्या रोजगार हमी योजनेची कामे गावातील नागरिकांनी मिळत नसल्याने यांस जबाबदार कोण? असा सवाल दोन्ही गावातील नागरिकांकडून केला जातो आहे.
एकीकडे शासन वर्षाकाठी एका कुटुंबातील सदस्यांना १०० दिवस रोजगार देण्याची हमी देतो तर दुसरीकडे मजुर वर्ग रोजगार हमी योजनेच्या कामापासून कोसोदुर असल्याचे दिसून येत आहे.भगवानपूर ग्रामपंचयतीच्या रोजगार हमी योजनेची ऑनलाईन लॉगिन केव्हा सुरू केली जाणार व गावातील नागरिकांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार मिळणार की नाही? असा प्रश्न पडला असल्याने गडचिरोली उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.