उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- सध्याचे युग डिजिटल युग म्हणून ओळखले जात आहे.असे असले तरी या डिजिटल युगात गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी बांधव आपल्यापेक्षा अनेक वर्षे मागे असल्याचे दिसून येत आहे.पूर्वीच्या युगात कावडीचा वापर केला जात होता.तशीच परिस्थिती आजच्या स्थितीत गडचिरोली जिल्ह्यात पहावयास मिळते आहे.जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या गावांतील रुग्णांना उपचारासाठी खाटेची कावड करून पायपीट करीत रुग्णालयात न्यावे लागत आहे.त्यामुळे आदिवासी बांधवांसाठी कावड हीच रुग्णवाहिका ठरत आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे.महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील हा परिसर अबुझमाड म्हणून ओळखला जातो.या अतिदुर्गम,आदिवासीबहुल डोंगराळ भागातील आदिवासींना उपचारासाठी भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय पर्याय नाही.त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर छत्तीसगड राज्यातील जवळपासचे आदिवासी बांधवसुद्धा याच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात.अनेक गावे अशी आहेत जिथे वाहन जायला रस्तासुद्धा नाही.त्यामुळे खाटेचा कावडच वापरावा लागत आहे.जिल्ह्यातील अनेक सीमावर्ती भागात अजूनही रस्त्यांचा अभाव असल्यामुळे आदिवासी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.या भागातील एखाद्या रुग्णास वेळेवर उपचार मिळणे कठीण आहे.रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी रुग्णांना खाटेचा पाळणा करून रुग्णालयात आणावे लागत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यास अनेकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागले आहे.आम्हाला जेवढे मिळतेय तेवढे कमीच आहे.मात्र अतिदुर्गम,आदिवासीबहुल,डोंगराळ भागातील आदिवासी बांधव अजूनही हाल अपेष्टा सहन करून कसेबसे उदरनिर्वाह करून जीवन जगतांना हल्ली दिसून येतात.तरी सुद्धा पोकळ आश्वासने देणारे आदिवासी बांधवांकडे दुर्लक्ष करीत असल्याने किती शरमेची व लाजिरवाणी बाब आहे.