- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कॅन्सर (Malignancy)आणि इतर गंभीर आजारांच्या शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून देण्याच्या दिलेल्या विशेष सूचनांना आता मोठे यश येऊ लागले आहे.गडचिरोली जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने एका पाठोपाठ एक, अशा दोन अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक अंडाशयाच्या गाठींच्या(Ovarian Tumor)शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना नागपूर किंवा इतर मोठ्या शहरात न जाता गडचिरोलीतच उच्च दर्जाचे उपचार मोफत व खात्रीशीर मिळत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
- पहिली यशस्वी केस: ६५ वर्षीय महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया👇
जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या पोटात अंडाशयाची मोठी गाठ(Ovarian Tumor)असल्याचे निदान झाले होते. रुग्णाचे वय आणि गाठीची जटिलता पाहता ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती.
स्त्रीरोग तज्ज्ञ तथा जिल्हा शल्य चिकित्सक(Civil Surgeon)डॉ.वर्षा लहाडे यांच्या खंबीर आणि कुशल मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.या शस्त्रक्रियेमध्ये त्यांना डॉ.आकाश, डॉ.शरद आणि डॉ.मानसी यांनी मोलाचे सहकार्य केले. शस्त्रक्रियेदरम्यान अत्यंत महत्त्वाची असणारी भूल देण्याची जबाबदारी भूलतज्ज्ञ डॉ.मित्तल आणि डॉ सुकेशनी यांनी चोख बजावली.तसेच,ऑपरेशन थिएटर इन्चार्ज माधुरी गेडाम व किरण सिस्टर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून त्यांची प्रकृती वेगाने सुधारत आहे.
- दुसरी यशस्वी केस: २६ वर्षीय तरुणीच्या दुर्मिळ कॅन्सरयुक्त गाठीवर यशस्वी मात👇
याच मोहिमेचा भाग म्हणून,ग्रामीण रुग्णालय धानोरा वरून संदर्भित झालेल्या एका २६ वर्षीय तरुण महिला रुग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्यंत क्लिष्ट असणारी शस्त्रक्रिया केली.या महिला रुग्णाच्या पोटात प्रचंड दुखत होते आणि साधारण २४ आठवड्यांच्या गर्भावस्थे एवढी मोठी गाठ पोटाला जाणवत होती.सीटी स्कॅन(CT-scan)आणि सोनोग्राफी(USG)चाचणीत तिच्या उजव्या अंडाशयामध्ये घन आणि द्रवरूप मिश्रित(Right Ovarian Solid Cystic Mass)मोठी गाठ असल्याचे समोर आले होते.सुरुवातीला ‘ट्युबो-ओव्हेरियन ॲब्सेस’ (Tubo-ovarian Abscess)असण्याची शंका देखील व्यक्त केली जात होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय पथकाने तात्काळ निर्णय घेत ‘एक्स्प्लोरेटरी लॅप्रोटोमी आणि उजवे अंडाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया’ यशस्वीरीत्या पार पाडली.ही शस्त्रक्रिया मुख्य शल्यचिकित्सक डॉ.मयुर दुधे,प्रथम सहाय्यक डॉ.कृणाल चेंदकापुरे,द्वितीय सहाय्यक S/N सुमेध कांबळे,तृतीय सहाय्यक S/N प्रियांका मडावी आणि भूलतज्ज्ञ डॉ.अंकिता भावते यांच्या पथकाने केली.शस्त्रक्रियेनंतर गाठीचा तपासणी अहवाल आला असून,त्यामध्ये हा एक दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर ‘मिक्स्ड जर्म सेल ट्युमर’ असल्याचे निष्पन्न झाले; ज्यामध्ये ९० टक्के वाटा ‘योल्क सॅक ट्युमर’ आणि १० टक्के वाटा ‘एम्ब्रायोनल सेल कार्सिनोमा’ चा होता.डॉक्टरांच्या तत्परतेमुळे या कॅन्सरयुक्त गाठीला शरीरातून वेळेत पूर्णपणे बाहेर काढण्यात यश आले असून रुग्णाचे प्राण वाचले आहेत.
- सर्वसामान्य रुग्णांना गडचिरोलीतच दर्जेदार आरोग्य सेवा👇
आरोग्य मंत्र्यांच्या संकल्पनेतून जिल्हा रुग्णालयात कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर शस्त्रक्रिया सुरू झाल्यामुळे गडचिरोली आणि परिसरातील गरीब व गरजू रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अगदी मोफत आणि यशस्वीपणे पार होत आहेत.या दोन्ही रुग्णांच्या यशस्वी उपचारामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे व त्यांच्या संपूर्ण डॉक्टर,नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफच्या टीमचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
- Advertisement -

