उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली करावी; अशी मागणी काँग्रेस कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी ३ मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली.
दुर्गम भागातील वेंगपूर, सुरगाव, अळंगेपल्ली तसेच पडकाटोला या चार गावांना मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना कडक शब्दात फटकारले आहे. पेसा कायद्याची अंमलबजावणीकडे दुर्लक्ष, कथित धान घोटाळ्यात दोषींना पाठिशी घातल्याचे प्रकरण, उद्योगांच्या नावाखाली जमीन संपादन करताना दडपशाही यामुळे जिल्हाधिकारी मीणा हे वादात सापडले असल्याचा दावा करत शेडमाके यांनी त्यांच्या बदलीची मागणी केली आहे.विशिष्ट लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील म्हणून ते ओळखले जातात; त्यामुळे लोकसभा निवडणुका पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी त्यांची बदली गरजेची असल्याचे शेडमाके यांनी तक्रारीत म्हटले आहे.

