उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- रोजची रोजी-रोटी कमावून खाणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या दराने आर्थिक विवंचनेत टाकले आहे.अशातच मिळणारी सबसिडीही बंद झाली असल्याने गॅस खरेदी करावे की उदरनिर्वाह करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील गृहिणींचा कल पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वाढलेला दिसून येतो आहे.
केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेमुळे गोरगरीबांच्या घरात गॅस सिलिंडर शेगडी पोहोचली आणि चुलींवरील स्वयंपाकाच्या धुरामुळे होणाऱ्या आरोग्यबाधेपासून त्यांचा बचाव झाला.योजनेच्या वेळेस गॅस सिलेंडर ‘स्वस्तात मस्त’ म्हणून नागरिकांना भुरळ घातली गेली.मात्र हल्ली गॅस सिलिंडर १२०० रुपयांपर्यंत खरेदी करण्याची वेळ आल्याने गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा उज्ज्वला गॅस धारकांना चुलीवर परतावे लागले आहे.चुलीवरच्या स्वयंपाकामुळे ग्रामीण भागातील महिलांना श्वसनाचे,डोळ्याचे,फुफ्फुसाचे आजार व इतर आजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले तर वन्यप्राण्यांचा धोका आणि मोडी आणल्या तर अवैध वृक्षतोडीचा गुन्हा.यामुळे ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशा पेचप्रसंगात ग्रामीण भागातील जनता अडकली आहे.