उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- जिल्ह्यातील कुही तालुक्या अंतर्गत येणाऱ्या माजरी गाव येथील सरपंच व इतर दोन महिला सदस्यांनी कराचा भरणा न केल्यामुळे त्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. घरटॅक्स मागणी बिल मिळाल्यानंतर दिलेल्या मुदतीत कराचा भरणा करण्यास दिरंगाई करणाऱ्या माजरी ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रपाल मारबते आणि महिला सदस्य कुंदलता रामटेके व रेखा पाचबुधे यांना अपात्र ठरविण्यात आले.यासंदर्भात अप्पर आयुक्त डॉ. माधवी खाडे चवरे यांनी नुकतेच आदेश जारी केले आहे.
ईश्वर भारती रा.माजरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अप्पर जिल्हाधिकारी यांनी २९ डिसेंबर २०२१ ला आदेश देत कर चुकवेगिरी केल्याबद्दल या तिन्ही जणांना अपात्र ठरविले होते.परंतु महाराष्ट्र अधिनियम १९५७ चे नियम १६ (२) अन्वये अप्पर आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात आली.सरपंच चंद्रपाल मारबते यांच्याकडे त्यांच्या वडिलांचे राहते घर क्र. १६९ सन २०२०-२१ चे बिल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मुदतीत दिले.मागणी बिल स्वीकृतीपासून ९० दिवसांच्या आत भरणा करणे अनिवार्य होते.मात्र ते न केल्यामुळे ईश्वर भारती यांनी सरपंच व दोन महिला सदस्यांच्या विरोधात अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. प्रकरणाची चौकशी करून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले. यानंतर त्यांनी अप्पर आयुक्तांकडे अपील दाखल केली.याबाबत अप्पर आयुक्तांकडे सखोल चौकशी करण्यासाठी ग्रामपंचायत सचिवांकडून ग्रामपंचायतचे दस्तावेज मागविण्यात आले. त्यात अपात्र सरपंच व सदस्यांसह इतर ग्रामस्थांना एकत्रच मागणी बिल देण्यात आले हे निदर्शनास आले.इतर लोकांनी ९० दिवसांच्या आत कर भरला.परंतु अपिलार्थीनी कराचा भरणा विहित मुदतीत न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.