कुरखेडा :- तालुक्यातील येंगलखेडा गावानजीक अनेक छोटी-मोठी गावे येत असून गावातील नागरिक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असतात.काहीजण दारू पिण्याच्या आहारी गेल्याने दिवसागणिक अवैधरित्या दारू विक्रेत्यांची घरे भरण्याचे काम करीत आहेत.’दारू विक्रेत्यांची घरे मस्त तर पिणाऱ्यांची घरे उध्वस्त’ असे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे.दोन बलाढ्य दारू विक्रेते एका विदेशी आय.बी.ची किंमत-३०० रुपये,विदेशी आर.एस.ची किंमत-३५० रुपये,थंडीगार बिअर ची किंमत- २७० रुपये व देशी दारूच्या टिल्लूची किंमत-६० रुपये प्रति विकल्या जात आहे.
अवैधरित्या दारू विक्रेत्यांना ‘ना कुणाचा धाक,ना दरारा’असल्याने राजरोसपणे खुलेआम साठवणूक करून दारूची विक्री व सगळीकडे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूचा पुरवठा केला जात असल्याची खमंग चर्चा सर्वत्र जनमानसात सुरू आहे.
बलाढय दारूविक्रेते सर्वांची तोंडे बंद करून आपला गाजावाजा करीत असल्याने पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता अवैधरित्या नकली देशी,विदेशी व थंडीगार बिअरची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक असल्याचे सर्वत्र सूर निघू लागले आहेत.
कुरखेडा तालुका मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पुराडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येंगलखेडा येथे दोन बलाढ्य दारू विक्रेते खुलेआम नकली देशी,विदेशी व थंडी बिअरची अवैधरित्या दारू विक्री करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर टांगला जात असूनही पोलीस प्रशासन एवढे गाढ झोपेत कसे?असा प्रश्न निर्माण झाला आहे.