उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मजुरांची डिजिटल हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.त्यानंतर मजुरांचे आधारकार्ड लिंक असलेले बँक खाते मजुरी जमा करण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, यासाठी मजुराचे आधारकार्ड अपडेट असणे आवश्यक आहे.अन्यथा बँक खात्यावर मजुरीची रक्कम जमा होण्याची अडचण येणार आहे.
रोजगार हमी योजना कामाच्या हजेरी पत्रकावर बोगस मजुरांची नावे नोंदवून मजुरीची उचल केली जात होती.जिल्ह्यात असे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आले होते.तर यासंदर्भातील तक्रारींमध्ये सुद्धा वाढ झाली होती.त्यामुळे केंद्र शासनाने या अनागोंदी कारभाराला कायमचा पायबंद लावण्यासाठी डिजिटल हजेरीचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत काम करणाऱ्या कामाच्या ठिकाणी नॅशनल मोबाइल मॉनिटरिंग सिस्टम या मोबाइल ॲपवर मजुरांची दैनंदिन नोंदणी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक कामासाठी हा निर्णय आता बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे आता रोजगार हमीच्या कामावरील मजुरांचे पैसे थेट मजुरांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे.मात्र,यासाठी मजुराचे बँक खाते आधारकार्डसह लिंक असणे अनिवार्य आहे. शिवाय आधारकार्ड अपडेट असणे आवश्यक आहे.अन्यथा मजूरी जमा होणार नाही.