- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-इंदिरा गांधी मुलांच्या वसतिगृहातील आंघोळीसाठी नहरावर गेलेले चार शाळकरी विद्यार्थी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना आज, सोमवारी १४ ऑक्टोंबर रोजी रामटेक तालुक्यातील घोटीटोक बोरी येथे उघडकीस आली.
मनदीप अविनाश पाटील (इयत्ता अकरावी),मयूर खुशाल बांगरे (इयत्ता नववी),मयंक कुणाल मेश्राम (इयत्ता आठवी),अनंत योगेश सांबारे (इयत्ता सातवी), अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत.ही सर्व मुले नागपूरची आहेत.
इंदिरा गांधी मुलांचे वसतिगृह येथील अधीक्षकांनी आज सकाळी वसतिगृहातील काही मुलांना शाळेतील आवारात वृक्षारोपणासाठी खड्डे करण्याकरता सांगितले होते.त्यानुसार,विद्यार्थ्यांनी खड्डे केले.काम पूर्ण झाल्यानंतर त्यातील आठ मुले आंघोळीकरता वसतिगृहामागे दोनशे मीटर अंतरावर असलेल्या पेंच डाव्या कालव्याच्या नहरावर गेली होती.त्यातील मनदीप पाटील,अनंत सांबारे,मयंक मेश्राम,मयूर बांगरे, कमलेश बाळू देऊळकर ही पाच मुले नहरात आंघोळीकरता उतरली होती.तर ओम विलास कारामोरे,यश हारोडे,गणेश राजू आजनकर ही नहराच्या काठावर होती.नहरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याने मनदीप,अनंत,मयंक,मयूर हे चार जण वाहून गेले. कमलेशला पोहता येत असल्यामुळे तो कसाबसा बचावला.सदरचा संपूर्ण प्रकार उर्वरित मुलांनी नहरालगत असलेले शेतकरी आणि शाळेतील अधीक्षकांना सांगितला.शेतमजुरांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत मुले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. घटनेची माहिती रामटेक पोलिसांना मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते,तहसीलदार रमेश कोळपे,नायब तहसीलदार भोजराज बडवाईक, पीएसआय मोरे यांच्यासह रामटेक,अरोली पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.त्यांनी नहर भागात वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला.मात्र मुले आढळली नाहीत.या दुर्दैवी घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच लोकांनी घटनास्थळ आणि शाळेच्या आवारात गर्दी केली.सदरच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.सायंकाळ पर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र,अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.
- Advertisement -