उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- लाचलुचपत प्रकरणात आरोपी असणारे एक सहकार अधिकारी मृत्यूनंतर निर्दोष ठरले.संबंधित अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी यासंदर्भातील न्यायालयीन लढा लढला.
बाबाराव श्यामराव विटाळकर असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून ते सावनेर येथे सहायक उपनिबंधक (सहकारी संस्था) होते.त्यांनी सावकारीचे लायसन्स देण्यासाठी तीन हजार रुपये मागितले; अशी तक्रार पवन जयस्वाल यांनी २५ जुलै १९९४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून विटाळकर यांच्याविरुद्ध सापळा रचून कारवाई करण्यात आली होती.त्यानंतर २८ फेब्रुवारी २००५ रोजी विशेष सत्र न्यायालयाने विटाळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. तसेच एकूण तीन हजार रुपये दंड ठोठावला.त्या निर्णयाविरुद्ध विटाळकर यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.ते अपील प्रलंबित असताना विटाळकर यांचा मृत्यू झाला.परिणामी त्यांच्या वारसदारांनी ते अपील पुढे चालविले.उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांनी अंतिम सुनावणीनंतर विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता ते अपील मंजूर करून विटाळकर यांना निर्दोष ठरविले व सत्र न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द केला. अपीलकर्त्यातर्फे वरिष्ठ ॲड.अविनाश गुप्ता यांनी कामकाज पाहिले.