- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना’ अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५ हजार रुपये इतके मानधन देण्यात येते.या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असावे.दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली असून त्यांच्यासाठी किमान वय ४० वर्षे निश्चित करण्यात आले आहे.अर्जदाराचे कला किंवा साहित्य क्षेत्रातील योगदान किमान १५ वर्षांचे असणे आवश्यक असून,त्यांनी सातत्यपूर्ण,दर्जेदार आणि उल्लेखनीय कार्य केलेले असावे.
योजनेत वयाने ज्येष्ठ,विधवा,परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.अर्जदाराच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न ६० हजारांपेक्षा अधिक नसावे.तसेच उपजीविकेचे प्रमुख साधन कला असलेले किंवा पूर्वी कलेवरच अवलंबून असलेले आणि सध्या इतर कोणतेही उत्पन्न नसलेले कलाकार या योजनेसाठी पात्र ठरतील.याशिवाय,केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेत नसलेले तसेच महाराष्ट्राचे रहिवासी असलेले साहित्यिक व कलाकारच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- आवश्यक कागदपत्रे👇
अर्जासोबत वयाचा दाखला,आधार कार्ड,चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला,इतर कोणत्याही नियमित पेन्शन योजनेचा लाभ घेत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र(दंडाधिकारी किंवा नोटरीसमोर),पती-पत्नीचा संयुक्त फोटो(लागू असल्यास),बँक पासबुक, अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास),राज्य अथवा केंद्र शासनाचे पुरस्कार प्रमाणपत्र(लागू असल्यास), नामांकित संस्था किंवा व्यक्तींचे शिफारसपत्र, सांस्कृतिक मंत्रालयाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास) तसेच कला किंवा साहित्य क्षेत्रातील किमान १५ वर्षांच्या योगदानाचे सबळ पुरावे जोडणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्जासह ऑफलाइन प्रस्तावही आवश्यक👇
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची पोचपावती आणि सर्व मूळ कागदपत्रांसह ऑफलाइन प्रस्ताव तयार करून संबंधित गट विकास अधिकारी,पंचायत समिती यांच्यामार्फत सादर करावा.महिला अर्जदार विधवा किंवा परित्यक्ता असल्यास त्याबाबतचा अधिकृत पुरावा जोडणे आवश्यक आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,३१ जुलै २०२६ नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि मुदतवाढही दिली जाणार नाही.त्यामुळे पात्र साहित्यिक व कलाकारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)पंकज भोयर यांनी केले आहे.
- Advertisement -

