- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- “नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)योजनेअंतर्गत मी ३० पाईपची मागणी केली होती.पाईप खरेदी केल्यानंतर अवघ्या ८ दिवसांच्या आत माझ्या खात्यात ८० टक्के अनुदान जमा झाले.यामुळे माझ्या शेतातील पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे,” असा आनंददायक अनुभव कुरखेडा तालुक्यातील बांधगाव येथील लाभार्थी शेतकरी प्रेमानंद तागडे यांनी व्यक्त केला.
- लाभार्थीच्या शेतात थेट पोहोचले कृषी अधिकारी👇
कुरखेडा तालुक्याच्या बांधगाव येथील प्रेमानंद तागडे यांनी पोकरा योजनेअंतर्गत सिंचनासाठी पाईपचा लाभ घेतला होता.या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि लाभार्थीच्या शेतातील सद्यस्थिती पाहण्यासाठी जिल्हा व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ पथकाने तागडे यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.योजनेचा लाभ थेट आणि अत्यंत वेगाने मिळाल्याबद्दल प्रेमानंद तागडे यांनी प्रशासनाचे आभार मानत तालुक्यातील इतर शेतकरी बांधवांनाही या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
- इतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत: PCBDC प्रणाली उपयुक्त👇
यावेळी लाभार्थीच्या शेताला भेट देण्यासाठी आलेल्या जिल्हा कृषी अधीक्षक प्रीती हिरवळकर यांनी सांगितले की,गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ५३२ गावे या प्रकल्पात समाविष्ट असून कुरखेडा तालुक्यातील ३७ गावांमध्ये योजना वेगाने सुरू आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सुरुवातीला स्वतःची गुंतवणूक करण्यासाठी पैसे नसतात,त्यांच्यासाठी PCBDC (Post-Clearance Beneficial Direct Credit)हा नवीन पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.
या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांना सुरुवातीला केवळ १० टक्के रक्कम भरावी लागते.उर्वरित रक्कम चलनाद्वारे खरेदी करून अनुदानातून थेट भरली जाते,ज्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होतो.मंडळ कृषी अधिकारी अमोल जनबंधू व उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रेमानंद तागडे यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही अर्ज केल्यानंतर त्यांना त्वरित मंजुरी देऊन थेट खात्यात सबसिडी हस्तांतरित केली जात आहे.ट्रिप,स्प्रिंकलर(तुषार सिंचन), एचडीपीई पाईप यांसारख्या सिंचन घटकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरत आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा(पोकरा)लाभ घेऊन प्रेमानंद तागडे यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही आपल्या शेतात सिंचनाची सोय करावी,असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने प्रीती हिरवळकर(जिल्हा कृषी अधीक्षक,गडचिरोली),रूपाली जाधव(तालुका कृषी अधिकारी,कुरखेडा),बी.कुलसंगे(सहाय्यक कृषी अधिकारी,कुरखेडा),रामटेके(मंडळ कृषी अधिकारी, कुरखेडा),अमोल जनबंधू (मंडळ कृषी अधिकारी, कुरखेडा)यांनी केले आहे.
- Advertisement -

