उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- शासन स्तरावरून सर्वसामान्य जनतेसाठी कितीही ठोस पावले उचलली जात असली तरीही; मुजोर लोक सेवकांस त्याचे कसलेही देणे-घेणे नसल्याचा हल्ली प्रकार निदर्शनास येऊ लागला आहे.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने दिनांक- १८ ऑगस्ट,२०२३ रोजी शासन परिपत्रक काढून तलाठ्यांनी मुख्यालयी राहण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.मात्र शासन परिपत्रक काढूनही तलाठ्यांचा मुख्यालयाला खो..! व शासनाच्या काढलेल्या परिपत्रकास तलाठ्यांकडून केराची टोपली दाखविली जात असल्याने सर्वसामान्य जनतेचा प्रश्न ऐरणीवर टांगला जातो आहे.
तलाठी हे क्षेत्रीय स्तरावरील सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पद असून जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो.शेतकऱ्यांशी निगडित पीक पाहणीची ई-पिक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करणे,नुकसानीचे पंचनामे करणे, दुष्काळ,अतिवृष्टी,नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी मदत व पुर्नवसनाचे काम करणे यासाठी तलाठी हे अतिशय महत्वाचा दुवा आहेत.परंतु तलाठी हे साज्याच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने तलाठ्यांची त्यांच्या साज्यातील उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला जातो आहे.अनेक गावांतील काही तलाठी नेमणूक असलेल्या गावात न थांबता तालुक्यावरूनच कारभार हाकत असल्याने ग्रामीण भागातील जनतेची धरपकड होत आहे.
अशातच काही तलाठी कार्यालयात बसून कारभार पाहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.शेतकऱ्यांना शेतीच्या व इतर विविध कामांसाठी तलाठी कार्यालयातून सातबारा,खाते उतारा,विविध प्रकारचे दाखले आदी विविध कागदपत्रे विविध कामांसाठी लागतात.शालेय विद्यार्थ्यांसह,नोकरदारांना विविध पदासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी जात प्रमाणापत्र,रहिवासी,कुटुंब प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे महत्वाची ठरत असतात.मात्र ही कागदपत्रे मिळविण्यासाठी सकाळपासूनच संबंधित शेतकरी, ग्रामस्थ या तलाठ्यांचा शोध घेत असतात.आज इथे तर उद्या तिथे अशाप्रकारे तलाठी घिरच्या मारत असतात.अनेक तलाठी कधी-कधी मोबाइलही बंद ठेवतात.तर त्यांचा कोतवालही ग्रामस्थांना त्याबाबत व्यवस्थित मागिती सांगत नाही.परिणामी तलाठी व कोतलाव यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे.अनेक गावांमध्ये खासगी क्लार्क किंवा गावचा कोतवालच तलाठ्यांची कामे करतांना दिसून येत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांसाठी लागणारी स्वाक्षरी व कागदपत्रे घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.विशेष म्हणजे तिथे गेल्यानंतरही तलाठ्यांच्या मनमानी कारभाराला सामोरे जावे लागते.गत अनेक महिन्यांपासून तलाठी आपल्या साज्याचा कारभार तालुक्याच्या ठिकाणावरून हाकत असल्याचे दिसत आहे.या मनमानी कारभारावर कुणाचाच अंकुश राहिला नसल्याचे दिसून येत असल्याने तलाठ्यांची कार्यालये झाली ‘शो पीस’ झाले आहेत; असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.तलाठी हजर राहत नसल्याने कार्यालये शोभेची वास्तू बनू लागली आहेत.विद्यार्थी, शेतकऱ्यांना गावातच कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत व त्यांचे होणारे हाल थांबवून संबंधितांना समज द्यावी; अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

