- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांसाठी “राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना” राबविण्यात येत आहे.१६ मार्च २०२४च्या शासन निर्णयानुसार या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा ५ हजार रुपये इतके मानधन देण्यात येते.
कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहून मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांना आर्थिक आधार देणे,हा या योजनेचा उद्देश आहे.अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असावे,तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही वयोमर्यादा ४० वर्षे आहे.संबंधित कलाकाराचे साहित्य किंवा कला क्षेत्रातील किमान १५ वर्षांचे अनुभव व कार्य अपेक्षित आहे.सातत्यपूर्ण आणि दर्जेदार कामगिरी करणाऱ्यांना तसेच वयोवृद्ध,विधवा,परितक्त्या व दिव्यांग कलाकारांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.कलाकाराची उपजीविका केवळ कलेवर अवलंबून असावी आणि वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे.तसेच अर्जदार कोणत्याही शासनाच्या नियमित पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा आणि तो महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.
या योजनेसाठी १ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत ‘आपले सरकार’ पोर्टलवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.
अर्जासोबत वयाचा दाखला,आधार कार्ड,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला,इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र (दंडाधिकारी अथवा नोटरीकडून),पती-पत्नीचा एकत्र फोटो (लागू असल्यास),बँक पासबुक,अपंगत्वाचा दाखला (लागू असल्यास),राज्य अथवा केंद्र शासनाचे पुरस्कार प्रमाणपत्र,नामांकित संस्था किंवा व्यक्तींचे शिफारसपत्र, सांस्कृतिक मंत्रालयाचे प्रमाणपत्र व कलेसंबंधी विविध पुरावे ही कागदपत्रे आवश्यक आहेत.कला व साहित्य क्षेत्रात आपले आयुष्य समर्पित केलेल्या,प्रतिकूल परिस्थितीतही सातत्याने योगदान देणाऱ्या ज्येष्ठांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत)रवींद्र कणसे यांनी केले आहे.
- Advertisement -

