- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,खोलीचा भाडेकरू अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याने घरमालकाने कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी सदरचा प्रकार उघड झाला.खोलीतून ३७ लाख रुपयांच्या छापलेल्या बनावट नोटा व छपाईसाठी वापरलेले इतर साहित्य मिळून तब्बल ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पुष्पक कृष्णा भेंडारकर ऊर्फ बेंडाणे वय ३० वर्षे,रा.त्रिमूर्तीनगर,नागपूर असे फरार संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांनी पुष्पकचा शोध सुरू केला असता,तो मुंबईत असल्याची माहिती मिळाली. बनावट नोटांची विक्री करण्यासाठी तो मुंबईत गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.
पुष्पक हा दीड वर्षापूर्वी खरबीतील चैतन्येश्वरनगर येथे राहणारे ५५ वर्षीय रमेश गंगाधर हरडे यांच्याकडे भाडेकरू म्हणून वास्तव्यास होता.नुकताच जानेवारीमध्ये भाडेकरार संपला होता.अश्यातच पुष्पक काही महिन्यांपासून रूम भाडेही देत नव्हता.हरडे यांनी खोली रिकामी करण्यास सांगितले असता पुष्पकने चाकू दाखवून धमकावल्याचा आरोप आहे. याबाबत हरडे यांनी वाठोडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अदखलपात्र नोंद करण्यात आली होती.पुष्पक अनेक दिवसांपासून खोलीकडे भरकटला नसल्याने शनिवार,२४ ऑक्टोंबरला हरडे यांनी हातोडीच्या मदतीने खोलीचे कुलूप तोडले.आत प्रवेश केल्यानंतर बादलीत नोटांचे बंडल,आजूबाजूला विखुरलेले कागद आणि नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा प्रिंटर दिसला.खोलीतील दृश्य पाहून हरडे यांच्या पायाखालची जमीनच सरकली. लागलीच हरडे यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खोलीची तपासणी केली असता ५०० रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल आढळले.नोटांची मोजणी करण्यासाठी यंत्र मागविण्यात आले तपासादरम्यान सुमारे ३७ लाख रुपयांच्या छापलेल्या बनावट नोटा आढळल्याची माहिती आहे.याशिवाय,एका बाजूने छपाई झालेल्या आणि दुसरी बाजू कोरी असलेल्या नोटाही मोठ्या प्रमाणात मिळाल्या. छपाईसाठी वापरलेले साहित्यही पोलिसांनी जप्त केले.जप्त केलेल्या नोटा खऱ्या व अन्य बाबींचीही पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे.तसेच संशयिताच्या नातेवाइकांकडेही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
- Advertisement -

