- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-अवैध वाळू उत्खनन प्रकरणी १० जून २०२५ च्या मध्यरात्री आरमोरी पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली असून आरमोरी तालुक्याच्या देऊळगाव व डोंगरसावंगी रेतीघाटांवर छापा टाकून १ कोटी ४५ लाख ७४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.करण्यात आलेल्या कारवाईत चार आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.तर यातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार असून आरमोरी पोलीस प्रशासन त्याच्या मागावर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
- अटकेतील आरोपी👇
१.ऋषी सितकुरा राऊत,वय ५६ वर्षे,रा.डोंगरसावंगी, ता.आरमोरी,जि.गडचिरोली.
२.विकासकुमार वीर चंद्रसिंग,वय २८ वर्षे,रा.मोहाड, ता.केळापूर,जि.यवतमाळ.
३.रूपेश अजित शेख,वय २९ वर्षे,रा.वर्धा जि.वर्धा.
४.मोहम्मद तौकीर अब्दुल हसन,वय २४ वर्षे,रा. अखर्तपूर,जि.शहडोल,मध्य प्रदेश.
- मुख्य सूत्रधार आरोपी फरार– १.शुभम अरुण निंबेकर रा.ता.आरमोरी,जि.गडचिरोली हा फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
माहितीनुसार,पहिल्या कारवाईत आरमोरी पोलिसांनी आरमोरी तालुक्याच्या देऊळगाव येथील वाळू घाटात धाड टाकली असता घाटातून रात्री दीड वाजेच्या सुमारास पोकलेन मशीनच्या सहाय्याने सुमारे १०० ब्रास वाळू काढण्यात आल्याचे आढळून आले.प्रकरणी केलेल्या कारवाईत आरमोरी पोलिसांनी ६० लाख रुपये किंमतीचे पोकलेन मशीन आणि ६७,५०० रुपये किंमतीचे १०० ब्रास वाळू असा एकूण ६० लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसऱ्या कारवाईत डोंगरसावंगी येथील वाळू घाटावर धाड मारून करण्यात आलेल्या कारवाईत ६० लाख रुपये किंमतीचे पोकेलेन मशीन,२५ लाख रुपये किंमतीचा ट्रक क्रमांक-एमएच ३२ एएस २७८६ आणि ६,७५० रुपये किंमतीची १० ब्रास वाळू जप्त करण्यात आली,असे एकूण ८५ लाख ६ हजार ७५० रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.
दोन्ही वाळू घाटांवर केलेल्या कारवाईत सुमारे १ कोटी ४५ लाख ७४ हजार २५० रुपये किंमतीची वाहने,यंत्रे आणि ११० ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
- चक्क वाळू डेपोच्या घाटावरच डल्ला👇
गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी ६ मार्च २०२५ रोजी जिल्ह्यात ६ खनिज डेपो कार्यान्वित केले असून या ६ खनिज डेपो पैकी आरमोरी तालुक्यातील देऊळगाव वाळू डेपोचा समावेश आहे. त्यातच आरमोरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत चक्क देऊळगाव वाळू डेपोच्या घाटातून अवैध उत्खनन करून डल्ला मारण्याचा प्रकार उघडकीस आल्याने यावर गडचिरोली जिल्हाधिकारी काय ॲक्शन घेतात,हे पाहणे आता महत्वाचे आहे.
- जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाला केराची टोपली👇
गडचिरोली जिल्ह्यात एकूण सहा डेपो कार्यान्वित झाल्याने अवैध उत्खनन प्रकरणी तक्रारी वाढू लागल्या आणि सरळ जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली जायची.त्यामुळे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी वाळू डेपो यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यावर सोपविली होती.जिल्ह्यात कोठेही अवैध उत्खनन होऊ नये,यासाठी सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या.तसेच अवैध उत्खनन अथवा वाहतूक आढळल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल,असाही इशारा जिल्हा प्रशासनाने दिला होता.मात्र,अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाला केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून येते.
- यापूर्वीही पोलीस प्रशासनानेच केली कारवाई👇
यापूर्वी आरमोरी तालुक्यातीलच डोंगरतमाशी येथील खोब्रागडी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर रेतीचा अवैध उपसा आणि वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी,उपनिरीक्षक दीपक कुंभारे,राहुल आव्हाड आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी १४ मार्च २०२३ च्या मध्यरात्री डोंगरतमाशी रेती घाटात धाड टाकली.काही जण ट्रक आणि टिप्परसह जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने रेती उपसा करीत असल्याचे निदर्शनास आले होते.त्यानुसार १६ जणांना अटक करून ३ कोटी ३० लाख ४० हजारांची वाहने व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले होते.रेती तस्करांवर पोलिसांनी केलेली गडचिरोली जिल्ह्यातील सर्वांत मोठी कारवाई मानली गेली होती.
- आरमोरी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी👇
यापूर्वीही १४ मार्च २०२३ च्या मध्यरात्री आरमोरी तालुक्यातीलच डोंगरतमाशी येथील खोब्रागडी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर रेतीचा अवैध उपसा आणि वाहतूक होत असतांना पोलीस प्रशासनानेच मोठी कारवाई केली होती.अश्यातच आताही १० जून २०२५ च्या मध्यरात्री पोलीस प्रशासनानेच कारवाई केली आहे.महत्वाचे म्हणजे,अवैध वाळू उत्खनन होत असतांना तहसीलदार,मंडळ अधिकारी व संबंधित साजाचे तलाठी यांना याबाबत काहीही माहिती नाही काय? शासनाची एवढी मोठी चोरी होत असतांना फक्त पोलीस प्रशासनासच माहिती पडते काय?मूंग गिळून गप्प राहणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर सर्वप्रथम कारवाई व्हायला पाहिजे.त्यातच अवैध वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणी जिल्ह्यात एकाही महसूल विभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याने असे प्रकार घडू लागलेत.त्यातच पोलिसांच्या वतीने केवळ आरमोरी तालुक्यातच कारवाई होतांना दिसून येत आहे.इतर तालुक्यातील पोलीस प्रशासन निद्रावस्थेत गेले की काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील मेंढा घाटात कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा सुरू असतांना कारवाई शून्य.
- Advertisement -

