उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांतील गावांमध्ये नेटवर्कचा अभाव असल्यामुळे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत चालू असलेल्या कामावर मजुरांची ऑनलाइन हजेरी घेताना ग्रामरोजगार सेवक व मजुरांनाही हजेरी देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.अशातच ग्रामरोजगार सेवक व मजुरांची ऑनलाइन हजेरीमुळे कुचंबना होत आहे.
ऑनलाइन हजेरी घेत असताना नेटवर्कचा प्रश्न निर्माण होतो.कधी मस्टर डाउनलोड तर गायब त्यामुळे ग्रामरोजगार सेवक व मंजूर मोठ्या अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्याच्या ठिकाणी दररोज ऑनलाइन हजेरी होत नसल्याने बऱ्याच ठिकाणी मजुरांनी मनरेगा कामाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे मनरेगा बिनकामाची ठरत आहे.महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऑनलाइन हजेरीमुळे मनरेगा कामात मोठी घट झाली असून गावपातळीवर बिनकामाची ठरली आहे. यापूर्वी मनरेगा अंतर्गत गावातच काम मिळत असल्याने मजुरांचे शहराकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण थांबले होते. परंतु आता ऑनलाइन ई-मस्टर काढल्यानंतर आणखी त्रास वाढला आहे. मनरेगामध्ये काम करूनही कामाची मजुरी वेळेत मिळत नसल्याने मजुरांमध्ये नाराजीचा सूर आहे. ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’ अशी भावना मजुरांमध्ये निर्माण होता आहे.त्यामुळे ऑनलाइन हजेरी बंद करून जुन्याच पद्धतीने हजेरी घेण्याची मागणी जोर धरू आहे.

