उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- अन्नधान्य,कडधान्य व राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल.तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल,हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात,ज्वारी, बाजरी,मका,नाचणी (रागी),तूर,मूग,उडीद,सोयाबीन, भुईमुग,सुर्यफुल या ११ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी👇
पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै तसेच भात,ज्वारी, बाजरी,मका,नाचणी (रागी),तूर,सोयाबीन,भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५० स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे.स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य,जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे 👇
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ),ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने सबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/ पासबुक पानाची प्रत.
पिक स्पर्धा बक्षिसाचे स्वरूप👇
१.तालुका पातळी- पहिले बक्षीस रुपये५०००,दुसरे बक्षीस रुपये ३०००,तिसरे बक्षीस रुपये २०००.
२.जिल्हा पातळी- पहिले बक्षीस रुपये१००००,दुसरे बक्षीस रुपये ७०००,तिसरे बक्षीस रुपये ५०००.
३.राज्य पातळी- पहिले बक्षीस रुपये ५००००,दुसरे बक्षीस रुपये ४००००,तिसरे बक्षीस रुपये ३००००.
तरी खरीप हंगाम सन २०२४ पिक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा; असे आवाहन बसवराज भी. मास्तोळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,गडचिरोली यांनी केले आहे.या योजने बाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग महाराष्ट्र राज्य संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in किंवा सबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

