उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- एटापल्ली तालुक्यातील बुर्गी (कांदोळी) पोलिस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या गुंडापुरी येथे बुधवारी अज्ञात इसमांनी आजी-आजोबा व नातीची हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते.या तिहेरी हत्याकांडामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांड प्रकरणी काल,शुक्रवारी पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करीत चार संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.एटापल्ली तालुक्यातील गुंडापुरी येथील रहिवासी देवू दसरु कुमोटी वय ६० वर्षे त्यांची पत्नी बिच्छे देवु कुमोटी वय ५५ वर्षे तसेच दिवाळीच्या सुट्टीसाठी आजी-आजोबांकडे आलेल्या १० वर्षीय अर्चना तलांडी यांची अज्ञात इसमांनी हातोड्याने वार करीत निर्घृण हत्या केली होती.
गुरूवारी सदर प्रकरण उघडकीस येताच बुर्गी पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला.तिहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी बुर्गी पोलिसांनी तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली असून या अंतर्गत काल,शुक्रवारी मृतकांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांशी चौकशी केली.सदर चौकशीदरम्यान संशय बळावल्याने गावातील चार व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.चौघांचीही सखोल चौकशी केली जात असून लवकरच हत्याकांडतील आरोपींना जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

