- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-शासनाच्या गौण खनिजांची चोरी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.शासन स्तरावरून याविरोधात कितीही कडक नियमावली तयार केली जात असली,तरीही मुजोर तस्करांना कुठलाही फरक पडत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.मागील एप्रिल महिन्यात भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पहेला ते बोरगाव खुर्द मार्गावर अवैध रेती घेऊन जाणाऱ्या एका ट्रक चालकाने मंडळ अधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली होती.अश्यातच आता नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यात अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांची मुजोरी उघडकीस आली आहे.प्रथमतः अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करतांना चक्क नायब तहसीलदाराला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला.बाजूला झाल्याने नायब तहसीलदार थोडक्यात बचावले. त्यानंतर,मुरूम उत्खनन ठिकाणी असलेल्या
जेसीबीवर कारवाई करत असतांना जेसीबी ऑपरेटरने नायब तहसीलदाराला जेसीबीला लटकलेल्या अवस्थेत सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. दरम्यान,जेसीबी काटेरी झुडपांतून चालवण्यात आली. नायब तहसिलदार यांनी जेसीबीला घट्ट पकडुन ठेवल्याने मोठी दुर्घटना होता-होता थोडक्यात बचावली.सदरची घटना कुही तहसील कार्यालयातंर्गत बोरी नाईक येथे मंगळवारच्या रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.यात कुही तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांचा शर्ट फाटला असून,त्यांच्या हाताला जखमा झाल्या आहेत.प्रकरणी जेसीबी चालक मयूर थोटे वय २५ वर्षे,रा.दहेगाव,ता.मौदा,हल्ली रा.राजोला, ता.कुही,जि.नागपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार ट्रॅक्टर चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
मंगळवारच्या मध्यरात्री अवैधरीत्या मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच बोरी नाईक परिसरात नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे पथकासह अवैध उत्खणनावर कारवाईसाठी गेले होते.त्यांच्यासोबत ग्राम महसूल अधिकारी मोहन पवार,आनंद मस्के,महसूल सेवक नीलेश तिरपुडे यांनी घटनास्थळावर धाड मारताच एका ट्रॅक्टर चालकाने निकाळजे यांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला.प्रसंगावधान राखल्याने ते थोडक्यात बचावले.दरम्यान,एमएच-४०-सीक्यू-२३८८ क्रमांकाची जेसीबी घटनास्थळावरून पळून जात असल्याचे दिसून येताच नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला.मात्र,जेसीबी ऑपरेटर पळून जात असतांना निकाळजे जेसीबीवर चढले.ऑपरेटरने त्यांना खाली पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला.दरम्यान, निकाळजे जेसीबीला लटकलेल्या अवस्थेत सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत फरफटले गेले.अखेर समोरून येणाऱ्या पोलिस पथकाने जेसीबी थांबवला आणि निकाळजे यांचा जीव वाचला.या कारवाईत वेलतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत व वेलतूर पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे,अवैध गौण खनिजांची चोरी करणाऱ्या तस्करांची मुजोरी वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे सिस्टम मधील काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांची त्यांना साथ असते.त्यामुळे,होणारच काय? सेटलमेंट करून टाकू.असा प्रकार हल्ली सर्वत्र घडू लागल्याने ‘दोष देऊ कुन्हा?’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
- Advertisement -

