गोंदिया :-शाळेची सुट्टी झाल्याने शाळेच्या गेटमधून विद्यार्थी बाहेर पडत असतांनाच अचानकपणे शाळेचा गेट(लोखंडी फाटक)अंगावर पडल्याने एका अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार ११ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथील नगरपरिषदेद्वारा संचालित पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा,लोधीटोला येथे घडली.यात निराली मनीष चाफले वय ११ वर्षे असे मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता पाचव्या वर्गात शिक्षण घेत होती.
आज,शनिवारी दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास शाळेची सुट्टी झाल्यानंतर विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत असतांना शाळेसमोरील गेट अचानक कोसळला.यात निराली गेटखाली अडकली आणि ती गंभीर जखमी झाली.घटनेनंतर तिला तातडीने तिरोडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारार्थ गोंदिया येथे नेत असतांनाच वाटेतच तिचा मृत्यू झाला.निरालीची आई शुभांगी चौधरी (चाफले)या पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा, लोधीटोला शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अश्यातच त्यांच्याच मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.शाळेचा मुख्य गेट गेल्या काही वर्षांपासून अत्यंत जीर्ण अवस्थेत होता.मात्र, याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

