उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-सध्याच्या घडीला राज्य शासन नवनवीन फंडे वापरून सर्वसामान्य नागरिकांना नवीन योजनांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुरळ घालू पाहत आहे.त्यामध्ये गत एका महिन्यात लाडकी बहीण,लाडका भाऊ,वयोश्री योजना,मोफत वीज,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना,तीर्थदर्शन यांसह अन्य काही योजनांची भर पडली आहे.यावरून नवीन योजनांचा धडाका; मात्र जुन्या योजनांचे काय? असा सवाल आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम यांनी उपस्थित केला आहे.
पात्र लाभार्थीचे जीवनमान उंचावणे,त्यांना मदतीचा आर्थिक हात देणे,अर्थसाहाय्य करणे,विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे यांसह अन्य उद्देश साध्य करण्यासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.नवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात सध्या लाभार्थीकडून आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे,ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.तर दुसरीकडे रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी,संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान,अस्पृश्यता निवारण आणि जातीभेद निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्य शासनाने अर्थसाहाय्य योजना सुरू केली.या योजनेंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला शासनाकडून ५० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते.या योजनेंतर्गतचे अनुदानही रखडले आहे.घरकुल लाभार्थ्यांची रक्कम,देसाईगंज तालुक्यातील मागील वर्षातील शेतकऱ्यांच्या पूर बाधित नुकसानीची रक्कम,स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत शौचालय बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांची रक्कम व जुन्या योजनेतील कितीतरी रक्कम अजूनही मिळालेली नाही.अशातच शासन नवीन योजनांचा बोजवारा करून ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे करू पाहत आहे.सर्वप्रथम शासनाने जुन्या योजनेतील रखडलेली रक्कम व अनुदान देणे आवश्यक आहे. मात्र,तसे काहीही दिसून येत नाही.त्यामुळे सरकारने नवीन योजनांच्या माध्यमातून नुसता देखावा करून चालणार नाही तर रखडलेले अनुदान व इतर योजनेतील रक्कम तात्काळ द्यावे; अशीही मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास यांनी केली आहे.

