उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे तसेच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे म्हणून राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे.पडीक जमीन लागवडीखाली आणून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी बांबू लागवडीचे अभियान राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत विविध जिल्ह्यात वेगवेगळे बांबू लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत.मनरेगांतर्गत ग्रामपंचायतींनाही उद्दिष्ट देण्यात आले असून त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
मग्रारोहयो योजनेंतर्गत बांबू मिशन अभियान राबविण्यात येत आहे.त्यासाठी पंचायत समिती कृषी विभाग,वनपरिक्षेत्र अधिकारी,वनविभाग,सामाजिक वनीकरण विभागाकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे सात लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे.पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे.यात वैयक्तिक लाभार्थी,शेतकरी किंवा बचत गट महिला यांना सात लाखांचे अनुदान देण्यात येते.वैयक्तिक लाभासाठी लाभार्थीकडे दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असावे.लाभार्थीचे संमतीपत्र,नरेगा जॉबकार्ड,७/१२, ८-अ उतारा,ग्रामपंचायतीचा ठराव,लाभार्थीचे बँक पासबुक, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.पाऊस कमी अथवा जास्त झाला तरी बांबूला नुकसान होत नाही.बांबूच्या बेटात दरवर्षी ८ ते १० बांबू तयार होतात. इतर पिकांच्या तुलनेत बांबू शेतीवर ३०-४० टक्के खर्च कमी येतो.तिसऱ्या वर्षीपासून उत्पादन काढता येत असल्याने शाश्वत उत्पन्न मिळू शकते.

