उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात चालले तरी काय?अशी म्हणण्याची वेळ ही आत्ताचीच नाही; तर पूर्वीपासूनचीच आहे.रुग्णांना कधी खाटेवर रुग्णालयात दाखल करावे लागते.तर कधी पावसाच्या दिवसात पुरातून वाट शोधावी लागते.अशातच आलापल्ली-भामरागड मार्गावरील एका नाल्याचा रपटा वाहून गेल्याने प्रसूतीसाठी जाणाऱ्या एका गरोदर महिलेवर चक्क जेबीसीच्या बकेटमध्ये बसून नाला ओलांडण्याची धक्कादायक वेळ ओढावली आहे.
आलापल्ली-भामरागड मार्गावर असलेले अनेक नाले आणि नद्यांवर मागील अनेक महिन्यांपासून पुलांचे बांधकाम सुरु आहे.परंतु बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आणि कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत.आवागमनाची तात्पुरती व्यवस्था म्हणून पुलाशेजारी रपटे तयार करण्यात आले आहेत. परंतु मागील दोन दिवसांपासून भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.त्यामुळे रपटे वाहून गेले आहेत.
काल,गुरुवारी १८ जुलैच्या सकाळी भामरागड तालुक्यातील कुडकेली येथील झुरी संदीप मडावी या २० वर्षीय गरोदर महिलेला पोटात दुखू लागले.आशा वर्कर संगीता शेगमकर यांनी ही माहिती सामुदायिक आरोग्य अधिकारी रिचा श्रीवास्तव यांना दिली. त्यानंतर श्रीवास्तव ह्या ताडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका घेऊन कुडकेली गावाकडे जाण्यास निघाल्या.परंतु,वाटेत नाल्याला पूर आल्याने आणि रपटा खचल्याने रुग्णवाहिका पुढे जाऊ शकत नव्हती.त्यामुळे आशा वर्कर संगीता शेगमकर व गावकऱ्यांच्या मदतीने झुरी मडावी हिला ३ किलोमीटर अंतरावरील नाल्यापर्यंत घेऊन आले. त्यानंतर तेथे कामावर असलेल्या जेसीबीच्या बकेटमध्ये बसून झुरी मडावीला नाला पार करावा लागला.यावरुन पावसाळ्याच्या दिवसांत भामरागडसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल तालुक्यातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची विदारक परिस्थिती दिसून येत आहे.निर्ढावलेले प्रशासन यातून धडा घेईल काय? व आतातरी जागा होईल कां? असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे.

