उद्रेक न्युज वृत्त :-येत्या ३५ वर्षांत म्हणजे २०६० पर्यंत भारताची लोकसंख्या १७० कोटींपर्यंत पोहोचणार असून,या शतकाच्या अखेरपर्यंत भारतच जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश राहणार आहे.२०६० नंतर काही काळ भारताची लोकसंख्या स्थिर राहून त्यानंतर त्यात किमान १२ टक्के घट होईल,असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एकीकडे भारताच्या लोकसंख्येत वाढ होत असताना, चीनची लोकसंख्या झपाट्याने कमी होत जाणार असून,या शतकाच्या अखेरीस चीनची लोकसंख्या ६३ कोटींपर्यंत खाली येईल,असे अहवालात म्हटले आहे.जागतिक लोकसंख्याविषयक अहवाल ११ जून रोजी जारी करण्यात आला.त्यात जगाची लोकसंख्या येत्या ५० ते ६० वर्षांत वाढत १०.३ अब्ज होऊन ती शतकाअखेरीस घटून १०.२ अब्ज असेल,असे म्हटले आहे.
या अहवालात काही विशेष बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.त्यानुसार सध्या भारताची लोकसंख्या १४५ कोटी असून,ती २०५४ पर्यंत १६९ कोटींपर्यंत पोहोचणार आहे.२०६० पर्यंत भारताची लोकसंख्या १७० कोटींच्या वर जाईल.यानंतर काही काळ भारताची लोकसंख्या स्थिर राहील व त्यानंतर ती घटण्यास प्रारंभ होईल. भारताची लोकसंख्या १२ टक्क्यांनी घटणार आहे. आज २०२४ मध्ये भारत लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.या शतकाच्या अखेरीपर्यंत ते स्थान कायम राहील.
भारताच्या लोकसंख्येची चढती कमान राहणार असली,तरी चीनची लोकसंख्या घटण्यास प्रारंभ झाला आहे.चीनची लोकसंख्या २०२४ मध्ये १४१ कोटी आहे.ती २०५४ मध्ये १२१ कोटींवर येईल.२१०० सालापर्यंत तर चीनची लोकसंख्या ६३.३० कोटींपर्यंत खाली येईल, असे या अहवालात म्हटले आहे. सध्याच्या लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या २१०० मध्ये राहण्याचा अंदाज असून, २०२४ ते २०५४ या ३० वर्षांत सर्वाधिक लोकसंख्या घट असणाऱ्या देशांत जपान आणि रशियापाठोपाठ चीन असेल.संयुक्त राष्ट्रांचे लोकसंख्याविषयक विभागाचे संचालक जॉन विलमॉथ म्हणाले की,सध्या चीनमध्ये असलेला जन्मदर पाहता,चीनच्या लोकसंख्येत घट होण्याचा अंदाज योग्य आहे.

