उद्रेक न्युज वृत्त :- इलेक्ट्रॉनिक साधने बाजारात उपलब्ध तर झालीच सोबतच ग्रामीण भागात विविध कंपनीचे भ्रमणध्वनी मनोरे उभे झाले असून सेवा सुरू झाली आहे.त्यामुळे शहरी भागातील डिजिटल रुपया आता ग्रामीण भागातही चांगलाच स्थिरावला आहे.आता पैसे खिशात ठेवून दुकानात जाण्याची मूळीच गरज नाही. त्यामुळे गेल्या दोन,तीन वर्षांपासून ग्रामीण भागातही ऑनलाइन व्यवहार जोरात सुरू आहे.
पूर्वीच्या तुलनेत सध्या ऑनलाइन व्यवहारावरच सर्वाधिक भर दिला जात आहे.त्यामुळे सध्या रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत.संसारोपयोगी महागाचे साहित्य, विविध साहित्यांपासून अगदीच दहा, वीस रुपयांना मिळणारी वस्तू, खाद्यपदार्थ विकत घ्यायचे असले तरी ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून पेमेंट केले जात आहे. रोखीने होणाऱ्या व्यवहाराचे प्रमाण
जेमतेम असून आता खिशात नव्हे तर बँकेच्या खात्यात पैसा असायला हवे, अशी अवस्था निर्माण झाली आहे. ग्राहकांच्या खिशात पैसे नसले तरी त्यांच्या बँक खात्यात पैसे असणे आवश्यक आहे. त्यामुळे मोबाइलच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करता येते. आता पेट्रोलपंप, किराणा दुकान, कपडे खरेदी, सोने खरेदी आदी विविध दुकानात डिजिटल पेमेंट करताना ग्राहक दिसून येत आहेत.तसेच वीजबिलही मोठ्या संख्येने ऑनलाइन केले जात असून नागरिक स्मार्ट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.सुरवातीच्या काळात प्रशासकीय पातळीवरून युद्ध स्तरावर जनजागृती करण्यात आली. नागरिकांनाही त्याचे महत्त्व पटले असून सध्या रोखीच्या व्यवहाराचे प्रमाण झपाट्याने कमी झाले असून डिजिटल पेमेंटला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

