- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार संघ,पुणे पदवीधर मतदार संघ,औरंगाबाद पदवीधर मतदार संघ,तर अमरावती शिक्षक मतदार संघ व पुणे शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे.अश्यातच नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या विरोधात नितेश कराळे मास्तर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवला.यामुळे नितेश कराळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून ६ वर्षाकरिता हकालपट्टी करण्यात आली आहे.पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर रोजी याबद्दलचे पत्रक काढले.
पत्रकात,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री.अभिजीत गोविंदराव वंजारी हे निवडणूक लढवित आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी काम करणे,ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ही नैतिक व राजकीय जबाबदारी आहे.परंतु,आपण पक्षाच्या धोरणांच्या व निर्णयांच्या विरोधात जाऊन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्याचप्रमाणे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा मला पाठिंबा आहे.अशा प्रकारचा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण करीत आहात अशा अनेक तक्रारी पक्षाकडे आलेल्या आहेत. आपली ही कृती पक्षाची शिस्त,धोरणे आणि महाविकास आघाडीच्या निर्णयांचे स्पष्ट उल्लंघन करणारी आहे. आपण अशाप्रकारे पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष/वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशानुसार, आपणास पक्षातून ६ वर्षाकरिता निष्कासित करण्यात येत आहे.याची आपण नोंद घ्यावी,असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

