- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू झाल्या. याबाबतची माहिती सकाळी ७:४० वाजता स्थानिक आशा स्वयंसेविका निर्मला नरोटे यांना मिळताच,त्यांनी विलंब न करता चंद्रकला सिडाम आरोग्यसेविका(ANM)यांना अवगत केले.माहिती प्राप्त होताच आरोग्यसेविकांनी तात्काळ रुग्णवाहिका चालकाशी संपर्क साधून सकाळी ८ वाजता रुग्णवाहिकेद्वारे गावाच्या दिशेने प्रस्थान केले. मुसळधार पावसामुळे मार्गातील नाल्याला पाणी असल्याने रुग्णवाहिका सकाळी ८:३० वाजता नाल्यापर्यंत पोहोचली.नाल्याला पूर आल्याने तेथून पुढे स्थानिक ग्रामस्थ व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने सकाळी ९:०० वाजता गरोदर मातेला सुरक्षितरीत्या फोल्डेबल स्ट्रेचरवरून(झोळी)नेत नाल्यापलीकडे उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत दाखल करण्यात आले.सकाळी ९:३० वाजता मातेला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम डांगे यांनी मातेची तपासणी केली असता तिचे हिमोग्लोबिन (Hb)५.६ ग्रॅम इतके कमी असल्याचे आढळले.मातेची प्रकृती व सुरक्षिततेचा विचार करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सकाळी ११:३० वाजता तिला पुढील उपचारासाठी सुरक्षितरीत्या एलकेएएम रुग्णालय,हेड्रीला संदर्भीत(Refer)करुन भर्ती करण्यात आले आहे. भौगोलिक अडचणी व पुराची परिस्थिती असतांनाही आरोग्य यंत्रणेने कोणतीही दिरंगाई न करता तत्परतेने संपर्क, समन्वय आणि उपचार प्रक्रिया पूर्ण केली असून मातेची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी सर्व आवश्यक वैद्यकीय पावले उचलण्यात आली आहेत; असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.हे सर्व जरी सत्य असले तरीही सदरच्या नाल्याबाबत व नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत आजपर्यंत प्रशासनाल जाग कां आली नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.अश्यातच आता पुलाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याच्या बाता झोडण्यात येत आहेत.त्यानुसार, एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गाव हे राज्य मार्ग क्र.३६३ जवळ असून,येथून जाणाऱ्या रस्त्याचे काम एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB)अंतर्गत मंजूर झाले आहे.सद्यस्थितीत या रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम प्रगतीत असून,सर्वेक्षण व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून संबंधित वनपरवानग्या प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम हाती घेण्यात येईल,अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्लीचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर सालोडकर यांनी दिली आहे.
कोईदूळ गावाजवळील नाल्यावर सध्या पूल नसल्याने विशेषतः पावसाळ्यात गावाच्या दळणवळणात अडचणी निर्माण होतात.अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी तसेच अन्य रुग्णांना उपचारासाठी आरोग्य संस्थेत पोहोचतांना अडचणी येतात.या पार्श्वभूमीवर नाल्यावरील पुलाच्या प्रश्नाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.
कोईदूळ गावातून जाणारा रस्ता हा राज्य मार्ग क्र. ३६३ चा भाग आहे.या मार्गाचे काम AIIB अंतर्गत मंजूर झाले असून त्याअनुषंगाने आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सध्या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम प्रगतीत आहे.सर्वेक्षणाच्या आधारे आवश्यक बाबी निश्चित करून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.सर्वेक्षण व आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तसेच संबंधित वनपरवानग्या प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नियमानुसार पुढील कार्यवाही करून काम हाती घेण्यात येईल,असे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर सालोडकर यांनी कळविले आहे.
- Advertisement -

