गोंदिया :-एका २८ वर्षीय महिलेचा मृतदेह मंगळवार ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारच्या सुमारास मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावरील तिरोडा तालुक्याच्या बोंडराणी जंगलातील पाणंद रस्त्यालगत पळसाच्या झाडाखाली संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.पोलिसांच्या प्राथमिक तपासात महिलेचा खून करून मृतदेह जंगलात फेकून दिल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत महिला ज्या व्यक्तीसोबत गेली त्यानेच तिचा घात केल्याचे निष्पन्न झाल्याने दवनीवाडा व खैरलांजी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.पूनम राकेश तुमाने वय २८ वर्षे रा.खैरी,जि.बालाघाट, मध्यप्रदेश असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे,तर गावातीलच संजय तितरमारे वय ४१ वर्षे,रा.खैरी, जि.बालाघाट असे आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी आरोपी संजय तितरमारे विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१)अन्वये गुन्हा दाखल करून त्याला बुधवार ४ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.त्यानुसार, तपासात आणखी महत्त्वाच्या बाबी उघडकीस आणायच्या असल्याने दवनीवाडा पोलिसांनी कोठडीत वाढ करण्याची मागणी करताच न्यायालयाने मान्य करून आरोपीच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.तत्पूर्वी गेल्या दोन दिवसांत पोलीस तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.पूनम तुमाने हिचा पतीसोबत बऱ्याच कालावधीपासून वाद सुरू होता.त्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तिला वारंवार वाराशिवनी न्यायालयात हजर राहावे लागत होते.यासाठी घराशेजारी राहणारा संजय तितरमारे हा तिला मदत करीत होता. सुनावणीसाठी वारंवार सोबत ये-जा करत असतांना दोघांमध्ये जवळीकता वाढली आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले.दरम्यान,पूनम हिला संजयपासून गर्भधारणा झाली.विशेष म्हणजे मृतक पूनम ही सात महिन्यांची गर्भवती होती.गर्भधारणेनंतर पूनम ही संजयकडे लग्नाची मागणी करू लागली.मात्र,संजय आधीच विवाहित होता आणि त्याचे कौटुंबिक आयुष्य सुरळीत सुरू होते.हे प्रकरण उघडकीस आल्यास समाजात आपली बदनामी होईल व संसार उद्ध्वस्त होईल,या भीतीने संजयने पूनमचा कायमचा काटा काढण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.२८ जानेवारी रोजी न्यायालयीन सुनावणीसाठी जात असल्याचे सांगून संजयने पूनमला तिरोडा तालुक्यातील बोंडराणी जंगल परिसरात नेले. निर्जनस्थळी नेल्यानंतर पूनमने पुन्हा लग्नाचा विषय काढून त्याच्यावर दबाव टाकला.त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.संतापाच्या भरात संजयने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला.ओळख पटू नये म्हणून तिच्या डोक्यावर वारंवार घाव घालून चेहरा विद्रूप केला व मृतदेह जंगलात फेकून तो पसार झाला होता.घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
- आरोपीने पोलिसांना दिला होता चकमा 👇

