- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-ऑनलाईन फसवणूक करणारे चोरटे मोबाईल ओटीपी,शासकीय योजनांची फाईल, एखाद्याची फोटो, ‘एपीके’ फाइल व इतर नाना तऱ्हेचे हतकंडे वापरून सर्वसामान्य नागरिकांच्या रकमेवर डल्ला मारत असतात. त्यामुळे अश्या चोरट्यांपासून सतर्क राहण्याच्या सूचना आम्ही वारंवार देत असतो.पण,अनेकजण याकडे दुर्लक्ष करतांना दिसून येतात व सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सहजपणे अडकून सर्वकाही गमावून बसतात.अश्याच प्रकारे “उद्रेक न्युज” च्या वतीने २८ जुलै २०२५ रोजी ‘आरटीओ चालान’ च्या नावाने व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या ‘एपीके’ फाइलने घात केला; फाईल इन्स्टॉल करताच मोबाईल हॅक झाला..या मथळ्याखाली बातमी प्रसारित करून सावधान व सतर्क राहण्याच्या सूचना केल्या होत्या.विशेष म्हणजे,छत्रपती संभाजीनगर शहराच्या छावणीतील एका मेडिकल व्यावसायिकाने आरटीओ चालान नावाची एपीके फाइल इन्स्टॉल करताच क्षणात मोबाईल हॅक होऊन काहीच मिनिटांतच मोबाईलवर ९ लाख रुपये खात्यातून गायब झाल्याचा मॅसेज आला होता.
सायबर क्राईम करणारे चोरटे पूर्वी शासकीय योजनांच्या नावाने एखाद्याच्या व्हॉट्सॲपवर ‘एपीके’ फाइल्स पाठवायचे.मात्र,सध्या ‘आरटीओ चालान’ च्या नावाने एपीके फाइल पाठवून मोबाईल हॅक करू लागले.अश्याच प्रकारे गोंदिया शहरात सदरचा प्रकार उघडकीस आला आहे.एका ४९ वर्षीय सोने-चांदीच्या दुकानदाराने ‘आरटीओ ई-चालान’ लिंकवर क्लिक करताच पाच लाख रुपये गमावले असल्याची घटना १६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली व संपूर्ण प्रकार काल शनिवारी उघड झाला.विवेक ओमप्रकाश अग्रवाल, सराफा लाइन,दुर्गा चौक,गोंदिया असे सायबर चोरट्यांचे बळी ठरलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे.१६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी अडीच वाजता अग्रवाल यांच्या मोबाइलवर ‘आरटीओ ई-चालान एपीके’ या नावाची लिंक आली.त्यांनी ती लिंक उघडताच मोबाइल हॅक झाला.काही क्षणातच त्यांना एचडीएफसी बैंक गोंदिया शाखेतील त्यांच्या चालू खात्यातून पाच लाख रुपये आयएमपीएसद्वारे काढण्यात आल्याचा मेसेज आला. बँकेत चौकशी केली असता,संबंधित रक्कम ओडिशा राज्यातील पुरी शहरातील एचडीएफसी बँकेच्या खात्यावरून ट्रान्सफर झाल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर अशुतोष नायक नावाच्या व्यक्तीने दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी चेकद्वारे संपूर्ण रक्कम विड्रॉल केली असल्याचे नोंदीत दिसून आले.या घटनेनंतर अग्रवाल यांनी त्वरित बँकेला माहिती दिली व पोलिसांत तक्रार नोंदवली. गोंदिया शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८(४) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक किशोर पर्वते करीत आहेत.
- असा करा बचाव👇
एपीके (Apk)फाईल म्हणजे अँड्रॉइड पॅकेज किट.हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे अप्लिकेशन्स इंस्टॉल करण्यासाठीची फाइल असते.प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरवर खात्रीशीर ॲप्स असतात.मात्र,टेलिग्राम, व्हॉटसॲप ग्रुपवर आलेल्या अशा एपीके (Apk) फॉरमॅटमधील फाइल्स धोकादायक असतात.एपीके फाइल इंस्टॉल करताच सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाइलचा ताबा मिळवतात.एपीके ॲपवर क्लिक करताच हिडन ॲप इंस्टॉल होऊन(मोबाइलमध्ये दिसत नाही)बॅकग्राउंडला सुरू करते.तुम्ही मोबाइलमध्ये जे काही करता,ते सायबर गुन्हेगारांना दिसते.बँक ॲप उघडताच ते त्याचाही ताबा मिळवतात.तुमचे सर्व मेसेज, कॉल एका विशिष्ट नंबरला ऑटो फॉरवर्ड होत असतात. त्यामुळे कोणतीही फोटो वा ॲप ऑटोमेटिक डाऊनलोड होऊ नये,यासाठी व्हॉट्सॲपचे ऑटो डाउनलोड मोड कायम बंद ठेवा.अनोळखी ॲप इंस्टॉल झाल्यास सर्वप्रथम मोबाईलचे फ्लाइट मोड ऑन करा.त्यानंतर डिव्हाइस फॅक्टरी रिसेट करा.फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० क्रमांकावर तक्रार नोंदवा.
- Advertisement -

