- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अनेकजण विविध कामासाठी बँका किंवा फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेत असतात.केव्हा-केव्हा दिलेल्या मुदतीत कर्ज फेडणे शक्य होत नाही.त्यामुळे वसुली करणारे अभिकर्ते घरापर्यंत येऊन वसुली करिता तगादा लावून मानसिक त्रास देत असतात.त्रासापायी अनेकजण टोकाचे पाऊल उचलतांना दिसून येतात.त्यामुळे तगादा लावून वसुली करणाऱ्या अभीकर्त्यांवर(एजंट)आता चाप बसणार आहे.कारण बेकायदेशीर व्यवहार आणि नोंदणीशिवाय कर्ज देणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सरकारने आता तयारी केली आहे.
नवीन नियमांनुसार,बँकांची बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या(RBI)मान्यतेशिवाय कर्ज देणे किंवा व्यवहार करणे अजामीनपात्र गुन्हा मानला जाईल.याचे पालन न करणाऱ्यांवर दंडासह दहा वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय डिजिटल व्यवहार किंवा अशा प्रकारचे इतर कोणतेही व्यवहार करणाऱ्यांना दोन ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख ते एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा प्रस्ताव आहे.एवढेच नव्हे तर कर्जदाराला त्रास दिल्यास किंवा वसुलीसाठी बेकायदेशीर पद्धती वापरल्याबद्दल तीन ते दहा वर्षांचा तुरुंगवास आणि मोठ्या दंडाची तरतूद आहे.या प्रकरणाची सीबीआयच्या कक्षेत चौकशी केली जाईल.अनियमित कर्ज व्यवहारांना आळा घालण्यासाठी आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी,डिजिटल कर्जावरील आरबीआय वर्किंग ग्रुपने नोव्हेंबर २०२१ मध्ये आपला अहवाल सादर केला होता.यावेळी अनियंत्रित कर्जावर बंदी घालण्यासाठी कायदे आणण्याची शिफारस करण्यात आली होती.रिझर्व्ह बँक किंवा इतर नियामकांकडे नोंदणीकृत नसलेल्या, इतर कोणत्याही कायद्यांतर्गत नोंदणीकृत नसलेल्या आणि सार्वजनिक कर्ज व्यवसायात सक्रिय असलेल्या अशा सर्व व्यक्ती आणि संस्थांवर बंदी घालण्यात आली आहे.असे असले तरी त्यात आपल्या ओळखीच्या आणि नातेवाईकांना कर्ज देणाऱ्यांचा समावेश नाही; हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.या कायद्याचे उल्लंघन करून डिजिटल किंवा इतर कर्ज देणाऱ्या कोणत्याही कर्जदाराला किमान दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.ही शिक्षा सात वर्षांपर्यंत वाढवता येईल,असेही या नव्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.यासोबतच गुंडगिरी करुन वसूली करणाऱ्यांवर दोन लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
कर्जदारांना त्रास देणाऱ्या किंवा वसुलीसाठी बेकायदेशीर पद्धती वापरणाऱ्या सावकारांना तीन ते दहा वर्षांचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो,असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.कर्ज वसूली करण्यासाठी सर्रास होणाऱ्या बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत.यातील प्रकरणांची व्याप्ती अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत विस्तारले असेल किंवा त्यात गुंतलेली रक्कम तुलनेने मोठी असेल तर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा,अशी तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे.बनावट कर्ज ॲप्सच्या माध्यमातून निरपराध लोकांना पैशांच्या जाळ्यात अडकवून फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. अनेक घटनांमध्ये खंडणीला कंटाळून लोकांनी आत्महत्याही केल्या आहेत.हे पाहता सरकारने सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मला अशा बनावट ॲप्सचा प्रचार करू नये,असे सांगितले होते.गुगलने सप्टेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान दोन हजार दोनशेहून अधिक फसव्या कर्ज ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहेत.
- Advertisement -

