- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-दोन दुचाकींची समोरासमोर आपसात जोरदार धडक झाल्याने यात दुचाकी चालक तलाठ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर दुसऱ्या दुचाकीवरील चौघांपैकी तिघे गंभीर व एकजण किरकोळ जखमी झाला.सदरची घटना देवलापार, ता.रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील पवनीनजीकच्या सीतापूर शिवारात काल,सोमवारी २३ सप्टेंबरच्या सायंकाळी ६:४५ वाजताच्या सुमारास घडली.
नरेश यादवसिंग उईके वय ४८ वर्षे,गंगाझरी,जिल्हा गोंदिया असे मृत तलाठ्याचे नाव असून,शुभम शंकर ताराचंद उईके वय १९ वर्षे,रोहन झामू भलावी वय २० वर्षे व मोनू रतनसिंग नागर वय २८ वर्षे अशी गंभीर जखमींची, तर शुभम शंकर उईके वय २५ वर्षे असे किरकोळ जखमीचे नाव असून,चौघेही पवनी,ता. रामटेक येथील रहिवासी आहेत.नरेश उईके हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून,ते रामटेक शहरात कुटुंबीयांसह राहायचे.त्यांच्याकडे रामटेक तालुक्यातील वडांबा,हिवराबाजार व दाहोदा या तीन तलाठी कार्यालयांचा कारभार असल्याने ते काल,सोमवारी सायंकाळी त्यांच्या एमएच-३५/एपी-१३८५ क्रमांकाच्या दुचाकीने दाहोदा येथून पवनी मार्गे रामटेकला जात होते.दुसरीकडे,चौघेही एमएच- ४०/ बीवाय-०६०७ क्रमांकाच्या दुचाकीने विरुद्ध दिशेने जात होते.
या दोन्ही दुचाकींची महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर जोरदार धडक झाली.यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नरेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर इतर चौघे जखमी झाले.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.त्यांनी चौघांवर पवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केले.त्यानंतर तिन्ही गंभीर जखमींना नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये,तर किरकोळ जखमीला देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले.शिवाय,नरेश यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवलापार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला.याप्रकरणी देवलापार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
- Advertisement -

