उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- गडचिरोलीजिल्ह्याच्या आदिवासी दुर्गम भागात आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे तसेच चलती का नाम गाडी असे केले जात असल्याने चिमुरड्या बालकांचा बळी जात असल्याचे चित्र हल्ली जिल्ह्यात निदर्शनास येऊ लागले आहे.अशातच कोरची तालुक्याच्या कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रापासून अवघ्या ६ किलोमिटर अंतरावरील येडजाल येथील शिवांगी नैताम या चारवर्षीय चिमुकलीचा मृत्यूचा प्रकार तब्बल १५ दिवसानंतर उघडकीस आला आहे.यामुळे सदर प्रकार लपविण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न होता काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आदिवासीबहुल कोरची तालुक्यात मलेरियाने अक्षरशः थैमान घातले आहे.सातत्याने मलेरियाग्रस्त रुग्णात वाढ होत असून,मृत्यूचे सत्र थांबत नसल्याचे विदारक चित्र या भागात निदर्शनास येत आहे. कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या येडजाल येथील शिवांगी कैलास नैताम या चारवर्षीय चिमुकलीचा मलेरियाने मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे मागील सहा महिन्यात तालुक्यात मलेरियामुळे चार बालकांचे बळी गेले आहेत.मागील काही महिन्यांपासून या भागात हिवतापाचा उद्रेक माजला असताना आरोग्य विभागाने अद्यापही ठोस पावले न उचलल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात मलेरियाचे रुग्ण वाढतीवर आहेत. दरवर्षी जून ते डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील हिवताप रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यात काहींना जीवही गमवावा लागतो.त्यामुळे मलेरिया आटोक्यात आणण्यासाठी दरवर्षी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केल्या जातात.मात्र,आरोग्य विभागातील रिक्तपदांसह ठोस उपाययोजने अभावी यावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.दरम्यान,मागील सहा महिन्यांपासून जिल्ह्याच्या उत्तर टोकावर असलेल्या आदिवासीबहूल कोरची तालुक्यात मलेरियाने थैमान घातले आहे.यापूर्वी मार्च महिन्यात तालुक्यातील कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या अवघ्या ४ किमी अंतरावरील गोडरी येथील प्रमोद अनिल नैताम (वय ४ वर्षे) व त्याची बहीण करिश्मा अनिल नैताम (वय ६ वर्षे) यांचा मलेरियाने मृत्यू झाला होता.त्यानंतर याच प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीतील आलोंडी येथील आरती कुंजाम (दीड महिने) या चिमुकलीचा मलेरियाने मृत्यू ओढावला.या मृत्यूमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली होती.याप्रकाराची खुद्द जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी दखल घेत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी यांना चांगलेच फैलावर घेऊन ताकीद दिली होती.तसेच काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाचीही कार्यवाही केली होती.परंतु,आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर याचा काहीच फरक पडला नसल्याचे शिवांगी नैताम या चिमुकलीच्या मृत्यूवरून स्पष्ट होत आहे.सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात १ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत १७९ मलरेयाबाधित रुग्ण आढळून आले आहे.यात शिवांगी या चारवर्षीय बालिकेचा मलेरियाने मृत्यू ओढावला आहे.विशेष म्हणजे शिवांगीचे येडजाल हे गाव कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रापासून अवघ्या ६ किमी अंतरावर आहे.यावरून आरोग्य विभाग अद्यापही कसे सुस्त आहे,हे यावरून स्पष्ट होते.

