- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-इराण-इस्रायल युद्ध सलग दुसऱ्या आठवड्यातही सुरू असल्याने जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे.त्याचा परिणाम म्हणून भारतात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाल्याचे समोर आले आहे.या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.घरगुती वापरासाठी लागणाऱ्या एलपीजीचा पुरवठा प्राधान्याने करण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.या टंचाईचा परिणाम हॉटेल व्यवसाय,उद्योग तसेच शाळांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवरही होत असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीवर न्यायालयाने गंभीर भूमिका घेतली आहे.या प्रकरणी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.तसेच येत्या,१७ मार्चपर्यंत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी,असे सांगण्यात आले आहे.घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा वाढवण्याची मागणी करत कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया कंपनीच्या सहा विक्रेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की,केंद्र सरकारने घरगुती वापरासाठी एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे आदेश दिले असतांनाही काही कंपन्या त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.विशेषतः कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया या कंपनीकडून घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा वाढवण्याबाबत आवश्यक पावले उचलली जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. निर्यात धोरणाचे कारण देत कंपनीने पुरवठा वाढवण्यास नकार दिल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर न्यायालयाने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
दरम्यान,मध्यपूर्वेतील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल आणि गॅस पुरवठा मोठ्या प्रमाणावर बाधित झाला आहे.विशेषतः सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि सीरिया यांसारख्या देशांतून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे एलपीजी उत्पादन आणि वाहतूक यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी भारतात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला असून अनेक भागांत ग्राहकांना गॅस मिळण्यात अडचणी येत असल्याचे चित्र आहे.
- Advertisement -

