उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ ऑगष्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली.संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती.जिल्ह्याला जिल्ह्याचा दर्जा मिळाल्यानंतर अनेक विकासकामे झाली.पण तरीही येथे मोठे उद्योग आले नाही.सध्या स्थितीत जिल्ह्यात सुरजागड-कोनसरी प्रकल्प जरी सुरू असला तरीही जिल्ह्यात अद्याप एकही मोठा प्रकल्प सुरू झालेला नाही.आज नाही तर उद्या जिल्ह्यात मोठा उद्योग उभा राहील,या आशेवर जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुण हात टेकून बसले आहेत.त्यामुळे आज जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज तयार झाली आहे आणि होतच आहे.रोजगाराच्या नावाखाली लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासने दिली जातात. मात्र,त्यांची पूर्तता होत नाही.त्यामुळे तरुणांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्याने विकासाचा गौरव केला असला,तरी येथील अनेक तरुणांना आजही रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न कायम आहे. अश्यात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील दुसरा कोणताही मोठा प्रकल्प नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार रोजगाराच्या शोधात इतर शहरात जात आहेत.दुसरीकडे जिल्ह्यात शेतीशिवाय दुसरा कोणताही रोजगार नसल्याने सर्वसामान्य नागरिक रोजगाराच्या शोधात इकडे-तिकडे भटकत असतात.उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात जिल्ह्यातील मजूर इतर शहरात रोजगारासाठी जातात.आपल्या कुटुंबाची काळजी असल्याने ते वाटेल ते काम करायला तयार असतात.त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुण गाव सोडत नाहीत.गडचिरोली जिल्ह्याला अनेक समस्यांनी घेरले आहे.जिल्ह्यात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते.ज्यामध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आशा असते.जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे.मात्र जिल्ह्यात रोजगाराबाबत कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत.यामुळे येथील तरुण आजही औद्योगिक क्रांतीच्या प्रतीक्षेत आहेत.

