उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-गावाबाहेर असलेल्या मुरमाच्या खाणीत बुडुन बालकाचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना काल,रविवारी २१ जुलैच्या सकाळी ११ वाजता गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पिंपळगाव/खांबी येथे घडली.मृत मुलाचे नाव रजनिश वामन शिवनकर वय १० वर्षे असे आहे. मृत रजनिश हा विद्यार्थी मनोजदेव मानकर आदिवासी आश्रम शाळा बोंडगांव देवी येथे इयत्ता ४ थी मध्ये शिकत होता.
मिळालेल्या माहितीनुसार,अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासुन मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वत्र पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीनाले ओसंडून वाहत आहेत.तर गावागावातील खड्डे व गावाबाहेरील मुरमाच्या खाणी पाण्याने तुडुंब भरलेल्या आहेत.अशावेळी तालुक्यातील पिंपळगाव/खांबी येथील वामन शिवनकर यांची दोन्ही मुले अन्य मुलांसोबत पटाची दान परीसरात फिरायला गेले.या परीसरात मुरमाच्या मोठमोठ्या खाणी असुन; मुसळधार पावसाने तुडूंब भरल्या आहेत.या खाणीत ही मुले आंघोळ करण्यासाठी उतरली.यामध्ये रजनिश वामन शिवनकर हा दहा वर्षाचा मुलगा खोल पाण्यात गेला.खोल पाण्यात बुडत असताना त्याच्या १४ वर्षाच्या मोठ्या भावाने रजनिशला वाचविण्याचा प्रयत्न केला.पण त्याला यश आले नाही.त्यामुळे घाबरलेल्या मुलांनी लगेच गावात येऊन लोकांना यीबीबत माहिती दिली.माहिती मिळताच,लगेच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर गावकऱ्यांनी सदर मुलाला बाहेर काढले.मात्र सदर मुलाचा मृतदेहच हाती आला.घटनेची माहिती मिळताच,अर्जुनी मोरगाव पोलिस घटनास्थळी पोहचले.मुलाचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे पाठविण्यात आले. सदर मुलाच्या दुर्देवी मृत्युने गावात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिस निरीक्षक सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात बिट अंमलदार कोडापे तपास करीत आहेत.

