उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यात या ना त्या कारणाने सतत वादग्रस्त ठरलेले जिल्हाधिकारी संजय मिना यांची अखेर शासनाने उचलबांगडी केली असुन त्यांचे जागी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने हे गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.दरम्यान ७ मार्च २०२४ रोजी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कामगार कमिटीचे अध्यक्ष छगन शेडमाकें यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन होऊ घातलेली लोकसभा निवडणुक प्रभावित करण्याची शक्यता नाकारता येत नाही,करीता तत्काळ बदली करण्याची मागणी मुख्य सचिव नितीन करीर यांचेकडे केली होती.तथापी शासकीय स्तरावरुन मिना यांच्या बदलिचे आदेशच काढण्यात आल्याने शेडमाकेंच्या प्रयत्नाचे हे मोठे यश मानले जात आहे.
शासन निर्गमित अ.शा.प. क्र.एईओ-११२४/५२०२४/भाप्रसे-१,सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई आज, दि.११ मार्च २०२४ च्या पत्रानुसार गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिना यांचे जागी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोलीचे संजय दैने यांची नियुक्ती केली असुन दैने यांना आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार प्रधान सचिव (ग्रामविकास व पंचायत राज) यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार संजय मिना यांचेकडून त्वरीत स्विकारण्याचे आदेश अपर मुख्य सचिव(सेवा)नितीन गद्रे यांच्या स्वाक्षरीनीशी देण्यात आले आहे.विशेष म्हणजे जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या दुर्गम भागातील वेंगणुर,सुरगाव,अळंगेपल्ली तसेच पडकाटोला या चार गावांना मुलभूत सुविधांपासुन वंचित ठेवल्याप्रकरणी नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात फटकारले आहे.जिल्ह्यातील सिएमआर मिलींग प्रकरणात वादग्रस्त ठरलेले मिना यांनी झेंडेपार लोहखदान प्रकरणी स्थानिक ग्रामसभांना विश्वासात घेऊन सुनावणी ग्रामसभेच्या माध्यमातून गावपातळीवर अथवा तालुकास्तरावर घेणे आवश्यक असतांना जिल्हाधिकारी मिना यांनी पेसा कायद्याला बगल देत उद्योगपत्यांना फायदा पोहचवण्याच्या हेतुने जिल्हास्तरावर सुनावणी घेतली असुन घेतलेल्या सुनावणीत स्थानिक नागरींकाना आपले मत मांडण्याची संधिच दिली नसल्याचा आरोप केला होता.
दरम्यान राज्यात पाच बॅचमध्ये २८ आयएएस अधिकारी व आणि २० अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर ५ ते २९ डिसेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आले होते.त्या प्रमाणीकरण शिबीराचा निकाल नुकताच लागला असुन केन्द्रीय निवडणूक आयोगाने राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला अपात्र अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगीतले आहे.सदर परिक्षा ५० गुणांची घेण्यात आली असून पास होण्याकरीता ३८ मार्क आवश्यक असतांना मिना यांना ३७ मार्क पडल्याने ते नापास झाले आहेत.विशेष म्हणजे जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या अनेक प्रकरणांत भुमिका संशयास्पद आढळून येत असल्याने व येथील माजी आमदारांनी सबळ पुराव्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याआधी अनेक तक्रारी केल्या असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या हिताचा दृष्टिकोन साधुन मिना यांची पाठराखण करीत असल्याचे दिसून येते.यामुळे होऊ घातलेली निवडणूक त्यांच्या दबावाखाली घेऊन प्रभावित करण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही गंभीर बाब लक्षात घेता मिना यांची तत्काळ बदली करून होत असलेला अन्याय थांबविण्याची मागणी शेडमाके यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली होती.

