उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी :- तालुक्यातील उदापूर ग्रामपंचायतीमध्ये १६,२०० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी उदापूरचे तत्कालीन ग्रामसेवक दिनेश श्रावण येरणे व तत्कालीन सरपंच योगेश तात्याजी तुपट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तत्कालीन सरपंचासह त्यांना अटक करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत उदापूरला सन २०१० ते २०१५ या कालावधीत सरपंच पदावर योगेश्वर तात्या तुपट व ग्रामसेवक दिनेश येरणे कार्यरत होते.यादरम्यान पाणीपुरवठा योजना सुरू झाली.ग्रामपंचायतीमध्ये शिपाई कार्यरत असतांना पुन्हा पाणीपुरवठा मदतगार म्हणून उदापूर येथील एका व्यक्तीची प्रती दिवस १०० रुपये मजुरी प्रमाणे नियुक्ती करण्यात आली.याच व्यक्तीकडे घरगुती नळ जोडणीचे कामसुद्धा देण्यात आले होते.नळ जोडणीचेसुद्धा व्हाऊचरद्वारे रकमा दिल्या.हा प्रकार कळताच मंडपे यांनी माहिती अधिकार २००५ नुसार माहिती मिळवून मिळालेल्या दस्तावेजाची बारकाईने तपासणी केली असता दोषी आढळून आले.
उदापूरमध्ये हयात नसलेल्या व्यक्तीचे नाव ग्रामपंचायत मजुरी हजेरी पटावर नोंदवून,त्याच्या नावाने स्वाक्षरी करून रक्कमेची उचल केल्याचे व्हाऊचर क्र.६ दि.३०/४/२०१८ ची नोंद असलेला हजेरी पटाची झेरॉक्स प्रत आढळली.तर काही हजेरी पटावर रक्कम उचल करणाऱ्यांच्या सह्या-अंगठेच नाही.यामुळे दिवाकर मंडपे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी; या करिता संवर्ग विकास अधिकारी ब्रह्मपुरी,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली.या तक्रारीवरून चौकशी अधिकारी जयेंद्र राऊत यांनी चौकशी करून जिल्हा उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल पाठविला.या चौकशी अहवालात तत्कालीन सरपंच व विद्यमान उपसरपंच योगेश्वर तुपट व तत्कालीन ग्राम सेवक दिनेश येरणे दोषी आढळले.यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करावा म्हणून दिवाकर मंडपे यांनी पाठपुरावा केला.याची दखल घेऊन संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी यांनी दि.१४ सप्टेंबर २०२२ ला तक्रार दिली.यावरून अप नं.४६१/२०२२ गुन्हा दाखल करण्यात आला असून नोंद करून पोलिसांनी दि.१४ मार्च रोजी ग्रामसेवक तर दि.१५ मार्च रोजी सकाळी सरपंचाला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेंद्र उपरे हे.कॉ.अरुण पिसे करीत आहेत.