उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- हत्तीचा कळप गोंदिया-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असून शुक्रवारी (दि.२१) या कळपाने राजोली,भरनोली शिवरामटोला,बल्लीटोला परिसरातील शेतात धानरोवणीचे नुकसान केले.कळपातील एक टस्कर हत्ती भरकटला असून तो देवरी तालुक्यातील ग्राम जेठभावडा येथे दिसल्याचे कळते.
गडचिरोली जिल्ह्यातून हत्तीचा कळप अर्जुनी-मोरगा तालुक्यात गेला असून बऱ्याच दिवसाच्या मुक्कामानंतर तो परतीच्या मार्गाला लागला आहे. तालुक्याच्या मुक्कामात कळपाने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान केले आहे.हतीच्या कळपाचे अर्जुनी-मोरगाव तालुका टार्गेट असल्याचे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही; सदर कळप इटियाडोह धरण नजीकच्या झाशीनगर उपसा सिंचन योजने शेजारच्या पहाडावर होता.चार ते पाच दिवसांपासून या कळपाचा राजोली, भरनोली, शिवरामटोला,बल्लीटोला परिसरात शेतशिवारात धुमाकूळ सुरू होता.शुक्रवारी (दि.२१) रात्री या कळपाने सुमारे १८ शेतकऱ्यांच्या शेतात नुकसान केल्याची माहिती आहे.
शनिवारी (दि.२२) हा कळप गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सिंदेसुर,बाम्हणी या परिसरात दाखल झाल्याचे समजते.गोंदिया-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने तो माघारी परततो की गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने आगेकूच करतो हे सांगता येत नाही.या कळपाचे जंगल मार्गाने मार्गक्रमण राहिल्यास शेतशिवाराचे कमी प्रमाणात नुकसान होईल.मात्र शेतमार्गाने मार्गक्रमण राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
खालील शेतकऱ्यांचे केले नुकसान 👇
गुरुवार व शुक्रवारी हत्तीच्या कळपाने राजोली व परिसरातील धान रोवणी तुडवली.दोन दिवसात सुमारे ३१ शेतकऱ्यांच्या धान पिकाचे नुकसान झाले आहे. तत्पूर्वी बुधवारी उमरपायली परिसरात नुकसान केले आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांत आनंदराव जांभूळकर, गोपाल शेंडे,आडकू नाईक,पंढरी बुद्धे,दिलीप बुद्धे, वासुदेव मस्के,फागु कोल्हे,दुधराम मस्के,रामदास मस्के,सुनीता लांजेवार,रामलाल लांजेवार,जगन लांजेवार,नामदेव लांजेवार तसेच भरनोली,बोरटोला येथील गणपत चौधरी,रमेश चौधरी,बकाराम नेताम, सदाराम नैताम,जयवंता मडावी,रघुनाथ कोवाची, मोहनलाल कुंभरे,धनिराम कुंभरे,मेनका कुंभरे,केशव कन्हाडे,रवींद्र कन्हाडे,विश्वनाथ सलामे,सुनीता सलामे, रयनलाल हारामी,दुधराम हारामी,देवराम हारामी व चुन्नीलाल हारामी इत्यादींचा समावेश आहे.