उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- सध्याच्या घडीला शेती करणे न परवडणारे झाले असतांनाही अनेक शेतकरी बांधव शेती करून,कसे-बसे उदरनिर्वाह करून,जीवन जगत आहेत.लागत खर्च जास्त तर उत्पादन कमी होत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आला आहे.शेतकऱ्यांचे हित जोपासणारे कायदे केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येतात.मात्र वन्यजीवांचे संरक्षणाचे कायदे अंमलात येतात.ही शोकांतिका आहे.शासनाच्या वन्यजीव कायद्यामुळे जंगलातील प्रत्येक जीवाला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे.मात्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित असून त्यांना शेतशिवारात जाणेही कठीण झाले आहे.
बऱ्याच पैकी शेतकऱ्यांच्या खरीप तसेच रब्बी हंगामातील ६० टक्के पीक जंगलव्याप्त शेतालगत आहे.या शेतातील पीक वन्यप्राण्यांच्या घशात जात असल्यामुळे शेतकरी उघड्यावर येत असल्याने अनेकांनी शेती सोडली.दरम्यान वन्यप्राणी शेतपिकांचे नुकसान करीत असून शेतकऱ्यांवरही हल्ले करीत असल्याने धोका वाढला आहे.या हल्ल्यात काही शेतकऱ्यांना जीवही गमवावा लागला असून अनेकांना अपंगत्वही आले आहे.त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
खरीप हंगामातील पिकांचा फडशा पाडल्यानंतर रब्बी हंगामातही त्यांचा उपद्रव सुरूच आहे.वन्यप्राण्यांमुळे पिके वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत असले तरी त्यांना यश येत नाही.शेतकरी बाराही महिने शेतात वास्तव्यास राहून दिवसरात्र पहारा देत आहेत.मात्र वन्यप्राण्यांची संख्या इतकी प्रचंड वाढली आहे की, पहारा देऊनही पिकांचे संरक्षण होऊ शकत नाही.
पेरणीपासून पीक हाती येईपर्यंत ग्रामीण भागांतील शेतकरी डोळ्यांत तेल घालून दिवसरात्र पिकांचे रक्षण करून संवर्धन करतो.त्यासाठी त्याला महिन्याकाठी हजार रुपये खर्च येतो,मात्र वन्यप्राण्यांच्या उपद्रव्याला शेतकरी रोखण्यास असमर्थ ठरत आहेत.

