उद्रेक न्युज वृत्त
सत्यवान रामटेके (संपादक)
गडचिरोली :- घरकूल योजनेसाठी शासनातर्फे शहरी भागासाठी २ लाख ५० हजार रुपये अनुदान दिले जाते.तर ग्रामीण भागासाठी १ लाख ३० हजार रुपये अनुदान दिले जात आहे.ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांची तुटपुंज्या अनुदाना अभावी थोडी-थोडी बांधकामे करून कितीतरी वर्षे बांधकामे पूर्ण करावी लागत असल्याने ग्रामीण व शहरी असा भेदभाव कां? शहरी भागात माणसे तर ग्रामीण भागात जनावरे राहतात की काय?असा सवाल ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थी नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.
सध्याच्या घडीला बांधकाम साहित्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.जसे,रेती,सिमेंट,लोहा,गीट्टी,विटा व इतर साहित्यांचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.अशातच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना अल्पशा अनुदानात घरकूल बांधणे अवघड जात आहे.त्यामुळे काहीजण पैस्याअभावी सुरुवाती पासून अंथरूण पांघरूण पाय पसरवीत असल्याचे दिसून येत आहेत.’थेंबे थेंबे तळे साचे’ असे करतांना अनेक लाभार्थी दिसून येतात.मात्र अशाही स्थितीत लोकप्रतिनिधी चुप्पी साधून पोकळ बाता करण्याचे काम सुरू असल्याचे जनतेतून म्हटले जात आहे.
घरकुलाचे साहित्य घेतांना शहरी व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना दर सारखेच लागत असतात.उलट ग्रामीण भागातील जनतेला शहरातून घरकुलाचे साहित्य आणावे लागत असल्यामुळे अधिकचे पैसे मोजावे लागत असतात.मात्र शासनाला याची जाण आहे की नाही? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.१ लाख ३० हजारामध्ये स्वतःसाठी शासनानेच घर बांधून दाखवावे असे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांनी म्हटले आहे.शासकीय बांधकामात ज्याठिकाणी २ लाखाचे काम असते; त्याठिकाणी ५ लाखाचे काम केले जाते.तर मग ग्रामीण व शहरी असा भेदभाव कां? त्यासाठी सरसकट ग्रामीण व शहरी भागासाठी २ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे; अशी मागणी सर्वच स्तरातील घरकुल लाभार्थ्यांकडून केली जात आहे.