उद्रेक न्यूज वृत्त
कोल्हापूर :-पतीच्या निधनाने आई सतत दुःखी राहायची.समाजात वेगळी वागणूक मिळू नये म्हणून आईचे दुसरे लग्न लावण्याचा धाडसी निर्णय मुलगा युवराजने घेतला.शेतकरी असलेल्या पाहुण्यातीलच व्यक्ती मारुती व्हटकर हे युवराजला योग्य वाटल्याने त्याने पुढची बोलणी सुरू ठेवली. आईला याबाबतची माहिती दिली.मात्र आईने यास स्पष्ट नकार दिला. काही दिवस तिची समजूत काढण्यात गेली.मुलाच्या हट्टापुढे शेवटी आई लग्नास तयार झाली.त्यापूर्वी तिने पाहुण्यांसह गल्लीतील काही महिलांच्या कानावर ही गोष्ट घातली.मुलगा पाठीशी असल्याने सर्वांनी तिला पाठिंबा दिला.१२ जानेवारीला पै-पाहुणे,शेजाऱ्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला.युवराजची इच्छा पूर्ण झाली. त्याच्या निर्णयाने कोल्हापूरने पुरोगामी चळवळीत आणखी एक नवे पाऊल टाकले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड (ता. शिरोळ) गावाने विधवा प्रथा बंद करून राज्यालाच नव्हे तर देशाला पुरोगामी चळवळीची दिशा दिली. याचे अनुकरण महाराष्ट्रातील अनेक गावांसह कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेशमधील गावांनी केले.याच चळवळीत पुढचे पाऊल युवराज शेले या युवकाने टाकले आहे. युवराजचे आई- वडील नारायण व रत्ना यांचा २५ वर्षांपूर्वी विवाह झाला. वडील सेंट्रिग काम करायचे. आई घरकाम करत त्यांना मदत करायची. त्यांचा संसार सुखाने सुरू होता. युवराजचे त्यावेळी शिक्षण सुरू होते.काही वर्षांपूर्वी कामावरून घरी परतताना नारायण यांचा अपघातात मृत्यू झाला होता.