उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा :- तालुक्यातील कुंभिटोला घाटावरून अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतुक करीत असल्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे.रेती परवाना एकीकडून तर रेतीचा उपसा दुसरीकडून केला जात असल्याने शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या महसुलास चुना लावण्याचे काम केले जात आहे.त्यामुळे गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन अवैध रेती उपसा व्यवसायावर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून केली आहे.
सदर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,महसूल विभागामार्फत देण्यात आलेल्या रेती उपसा करण्याच्या दिलेल्या परवानाच्या नियमांना धाब्यावर बसवून रेती वाहतूक कुंभिटोला घाटातून केली जात आहे.ज्या ठिकाणावरून रेती उपसा करण्याचा परवाना सदर रेती मालकाला सातबारा मिळालेला आहे.त्या ठिकाणाहून रेतीचा उपसा न करता इतरत्र ठिकाणावरून रेतीचा उपसा होत आहे.उपसा होत असलेली जमीन तुकाराम कांडे पोरेटी यांच्या नावे असून,ज्या सातबारावर रेती उपसा करण्याचा परवाना दिला आहे; त्याचे यापूर्वीच ईपिक पाहणी केली असून उत्पन्नही दाखवले व धान विक्री केली आहे.तर मग २०२१ पासून २०२३ पर्यंत रेती उपसा करण्याचा परवाना कसा मिळाला ? हा संशोधनाचा विषय असून रेतीचा उपसा हा दिलेल्या वेळेनुसार होत नाही.याबाबत तहसीलदार यांच्याकडे माहिती दिली असता,संबंधित प्रकाराकडे कानाडोळा करण्यात येत आहे.एकंदरीत सर्व प्रकार हा अवैध असल्याचे निष्पन्न होत असून,सदर प्रकरणाची लवकरात लवकर उचित चौकशी करून प्रकरणातील संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी व गावकऱ्यांना योग्य न्याय देण्यात यावा; तसे न झाल्यास गावकऱ्यांमार्फत संबंधितांवर कारवाई केली जाईल व होणाऱ्या कारवाई करीता सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असे निवेदनात म्हटले आहे.
सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याने प्रशासनाने याकडे कानाडोळा न करता गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.
