उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यात रेती तस्करी नवीन विषय नसला तरी रेती तस्करांच्या वाढत्या मुजोरीसमोर प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून येत आहे.रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेतीचे भाव गगन चुंबी झाले आहेत.अशातच घरकुल लाभार्थ्यांसह सर्वसामान्यांना रेती पुरवठ्याची झळ सोसावी लागत आहे.
जिल्ह्यात वैनगंगा नदी नदीपात्रातील रेती उच्च दर्जाची आहे.त्यातही वैनगंगा नदीपात्रातील रेतीचे मोठ्या प्रमाणात अवैध उपसा रेती तस्करांकडून केले जात आहे.वैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे आहेत.पावसाळ्यात पूर आल्यानंतर संपूर्ण नदीपात्रात पुन्हा एकदा उच्च दर्जाच्या रेतीचा भरणा होत असतो. ही एक नैसर्गिक देणगीच जिल्ह्याला मिळाली आहे. याचाच फायदा जिल्ह्यातील रेती तस्कर घेतांना दिसून येत आहेत.
काही मुजोर रेती तस्करी करणारे धमकीवजा बोलणी करून ‘हमरी-तुमरी’ वर येतांना दिसून येतात. जणूकाही रेती घाट त्यांनीच विकत घेतला की काय?लिलाव प्रक्रिया रखडल्याने चांदीच-चांदी रेती तस्करांची झाली आहे.एखादे वेळेस जेव्हा मोठा फटाका फुटेल त्यावेळेस मुजोरी करणे महागात पडणार आहे.’चोरी तर चोरी वरून शिनाजोरी’ अशी अवस्था हल्ली निदर्शनास येऊ लागली आहे.रेती घाट लिलाव प्रक्रिया जोपर्यंत होणार नाही; तोपर्यंत रेतीच्या चोऱ्या थांबणार नसल्याचे दिसून येते.