उद्रेक न्युज वृत्त
अकोला : एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला चिठ्ठी देऊन त्यावर मोबाइल नंबर लिहिणाऱ्या युवकाला चांगलेच महागात पडले आहे.या प्रकरणी आरोपी युवकाला दोषी ठरवत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.पवन त्रंबक इंगळे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
३१ मार्च २०२० रोजी पीडित मुलगी तिच्या घरी होती. यावेळी आरोपी हा तिच्या घरी गेला आणि त्याने तिला चिठ्ठी दिली.त्या चिठ्ठीवर त्याने त्याचा मोबाईल नंबर लिहला होता व तिला फोन करण्यास सांगितले होते. त्यानंतर आरोपी हा पीडितेला वाईट नजरेने पाहत असे.अखेर मुलीने तिच्या आईला हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर मुलीची आई ही आरोपीला समजावण्यासाठी त्याच्या घरी गेली होती.
मात्र आरोपीने तिच्या आईला शिवीगाळ केली. त्यानंतर पीडित मुलगी व तिची आई दोघींनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीविरूद्ध अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले.साक्षपुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी पवन त्रंबक इंगळे याला कलम ३५४ नुसार तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व हजार रुपये दंड,दंड न भरल्यास एक महिना साधी कारावास,पोक्सो कलम ११,१२ मध्ये तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व हजार रुपये दंड,दंड न भरल्यास एक महिना साधी कारावास,सर्व शिक्षा एकत्रित भोगाव्या लागणार आहेत.